भंडारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. या ई-पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, भंडाऱ्यात हे प्रमाणपत्र तपासणी न करताच दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, या बोगस प्रमाणपत्रासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे या बोगस प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याविषयी डॉक्टरांना विचारले असता त्यांनीही कबुली दिली आहे, की इथे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची वैद्यकीय तपासणी न करता आम्ही त्यांना प्रमाणपत्र देतो. कारण, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लागणारे यंत्र आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याविषयी भंडारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जाधव यांना विचारले असता याविषयी तपासणी करू आणि सत्यता आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.