भंडारा - जिल्ह्याच्या पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुनम विलास काटेखाये यांना कामात अनियमितता, पदाचा दुरुपयोग आणि विकासकामांमध्ये मोठा घोळ केल्याच्या आरोपाखाली नगर विकास मंत्रालयाच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे.
2 कोटीच्या भ्रष्टाचाराचा झाला होता आरोप
काटेखाये यांच्याविरोधात 17 पैकी 12 नगरसेवकांनी फेब्रुवारी महिन्यात तक्रार केली होती. यामध्ये एकच रस्ता दोन वेगळ्या नावाने दाखवत काम पूर्ण झाल्याचे सांगत रक्कम उचलली असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये सार्वजनिक वाचनालय ते चांदेवार चौकपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ज्याची एकूण किंमत 42 लाख 26 हजार एवढी होती त्याचे काम पूर्ण झाले असून देयक उचलले आहे. तसेच, बावनकर गोडाऊन ते डॉक्टर लेपसे चौकापर्यंत पूर्ण रुंदीचा रस्ता ज्याची अंदाजे किंमत 47 लाख 90 हजार एवढी आहे याचेही काम पूर्ण झाले, अशी माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात हे दोन्ही काम एकाच रस्त्याचे असून, लेपसे चौक आणि चांदेवार चौक हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. तसेच, हे दोन्ही काम अजूनपर्यंत पूर्ण झालेच नाही. मात्र, कामाच्या नावावर पैसे उचलले गेले आणि त्यामुळेच रस्ता चोरीला गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.
इतर बांधकामांमध्येही गैरप्रकार
तसेच, अशीच परिस्थिती इतर बांधकामांच्या ठिकाणी आहे, असा आरोप नगरसेवकांनी लावला होता. भिवापूर वाडी ते श्रीराम मंदिर शेतीपर्यंतच्या नाल्यास काँक्रिट संरक्षण भिंतीचे बांधकाम किंमत 2 कोटी 43 लाख एवढे असून संपूर्ण निधी खर्च झालेला आहे. तसेच, धोबीतलाव ते काटेखाये यांच्या शेतापर्यंत सिमेंट काँक्रिटचा नाला किंमत 80 लाख 36 हजार एवढे असून काम सुरू असल्याचे दाखविले आहे. मात्र, प्रत्यक्षात भिवापूर वाडी आणि काटेखाये यांची शेती हे दोन्ही एकच ठिकाण आहे. अध्यक्षांनी त्यांच्या शेतासाठी चक्क नाल्यावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची निर्मिती केली आहे आणि नाल्याचे काम अपूर्ण असतानाही ते पूर्ण झाल्याचे दाखवत 2 कोटी 43 लाखाची उचल केली आहे. असा आरोप नगरसेवकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून केला होता.
समितीच्या चौकशीत नगराध्यक्ष पूनम काटेखाये दोषी
नगरसेवकांचे आरोप व उपलब्ध माहितीवर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी लावली होती. चौकशीत तथ्य आढळून आल्यावर त्यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत चौकशी समिती गठीत केली. समितीच्या चौकशीत नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी जनहिताकडे दुर्लक्ष केले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने शासकीय निधी जनहितासाठी वापरला जाईल याची दक्षता घेतली नाही. हा निधी वापरताना शासकीय नियम, कायद्याचे पालन करणे गरजेचे असताना तसे न करता जाणीवपूर्वक व कुटुंबीयांचे हित विचारात घेऊन अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
16 मुद्यांपैकी आठ मुद्दे चौकशीत गृहीत धरले गेले
12 नगरसेवकांनी नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांच्यावर 16 कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यापैकी तीन व्यवहारात तथ्य नसल्याचे दिसून आले. तर, पाच व्यवहारांमध्ये गरज नसतानाही कामे मंजूर करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, असे असले तरी ही कामे प्रत्यक्षात सुरू न झाल्याने नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांना जबाबदार धरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर, आठ मुद्यांमध्ये नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांनी अनियमितता व स्व-हित लक्षात घेऊन कामे केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले असून उर्वरित मुदतीत त्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून निवडले जाण्यास पात्र असणार नाही.
हेही वाचा - वीज बिल माफीसाठी भंडारा जिल्ह्यात भाजपचे आंदोलन; धान खरेदी केंद्र सुरू करण्याचीही मागणी