भंडारा - पवनी तालुक्यातील केसलवाडा गावात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील कुणाल रामटेके या 22 वर्षीय धाडसी तरुणाने दोन चिमुकल्यांपैकी एका मुलीला वाचवले आहे. या घटनेत प्रमोद बारसागडे (वय 40) आणि सानवी बारसागडे (18 महिने) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, शर्वरी बारसागडे (वय 5) हिला वाचवण्यात यश आले आहे.
प्रमोद यांनी विहिरीत उडी घेताच गावकरी विहिरीशेजारी जमले. मात्र, विहिरीत अंधार असल्याने कुणी त्यांना वाचवण्याचे धाडस केले नाही. त्याचवेळी कुणालने तत्परता दाखवत विहिरीत उडी घेतली. दोरीच्या आधाराने त्याने दोन्ही मुलींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अथक परिश्रमानंतर त्याने शर्वरीला बाहेर काढले. परंतू, सानवीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कुणालच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रमोद बारसागडे हे मनोरुग्ण असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शंका त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आत्महत्येमागचे मागचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.