भंडारा - जिल्ह्यातील खरीप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. तर, बियाणे आणि खतांची मागणीनुसार उपलब्धता असून यांची टंचाई भासणार नाही, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, शासनाच्या महाबीज निर्मितीच्या कामाला कोरोनाचा फटका बसला आहे. परिणामी यावर्षी बियाणे उत्पादन काही प्रमाणात घटले असून शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी मिळणारे अनुदान अजूनही मंजूर झालेले नाही. त्यामुळे सध्या तरी शेतकरी बाजरातील स्वतः मात्र प्रमाणित नसलेले बियाणे खरेदी करत आहेत.
खरीप हंगाम 2020-21 पुढच्या 15 दिवसात सुरू होणार आहे. यावर्षी भंडारा जिल्ह्यात एक लाख 94 हजार हेक्टरवर भाताची, 1 हजार 200 हेक्टरवर तुरीची आणि 550 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे महाबीज आणि खाजगी कंपनीतर्फे पुरविले जाणार आहेत. यातील जवळपास 80 टक्के बियाणे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे, बियाणांची कमतरता पडणार नाही आणि कृषी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आत्माद्वारे बनविलेल्या शेतकरी गटामार्फतच शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बियाणे पोहोचवले जाणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी 67 हजार मेट्रिक टन खतांची मागणी आहे. यापैकी 40 हजार मेट्रिक टन खते सध्या उपलब्ध असल्याने खतांची टंचाई निर्माण होणार नाही. तसेच जिल्हा स्तरावर आणि तालुकास्तरावर भरारी पथके निर्माण केली आहेत. तसेच, बोगस बियाणे कुठेही जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.
मागणीनुसार प्रमाणित बियाणे पुरवठा करणारी शासकीय यंत्रणा म्हणजे महाबीज. महाबीजने मागच्या वर्षी ठोकळ आणि मध्यम वाणाचे 6 हजार 274 क्विंटल बियाणे विकले होते. तर, यावर्षी 16 हजार 54 क्विंटल बियाणांची मागणी होती. सध्या 3 हजार 634 क्विंटल म्हणजे केवळ 58 टक्के ठोकळ वाणाचे बियाणे पुरविल्या जात आहे. तर, बारीक वाणात 875 क्विंटल बियाणांची विक्री मागच्या वर्षी केली गेली होती. यावर्षी 914 क्विंटलची मागणी होती. यापैकी 865 क्विंटल म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 99 टक्के पुरवठा केला गेला आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील धान लागवडीची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. ठोकळ धानाला शासनातर्फे भरघोष बोनस मिळत असल्याने 60 टक्के शेतकऱ्यांनी आता ठोकळ वाण लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागच्या दोन वर्षात जिल्ह्यात बारीक धानापेक्षा ठोकळ धानाच्या बियाणांची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे यावर्षी महाबीजची बियाणे उत्पादन निर्मिती कमी झाली. कारण 15 दिवस कारखाना पूर्णपणे बंद होता. नंतर मोजक्या लोकांना घेऊन उत्पादन केले गेले. त्यामुळे अपेक्षित बियाणे निर्मिती करता आली नाही. तसेच दरवर्षी केंद्र आणि राज्य शासनातर्फे बियाणांवर मिळणारे अनुदान अजूनही मिळालेले नाही.
महाबीजची बियाणे ही प्रमाणित असल्यामुळे बाजारात मिळणाऱ्या बियाणांपेक्षा ती महाग असतात. शासनाचे अनुदान मिळाल्यावर ही बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी परवडतात. मात्र, अजूनही अनुदान न मिळल्याने शेतकरी हा प्रमाणित बियाणे न घेता अप्रमाणित कमी दरातील बियाणे खरेदी करत आहे.