भंडारा - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला आहे. त्यामुळेच संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त अडचणीत हातावर पोट असलेला मजूर वर्ग सापडला आहे. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीचा चंद्र कसा मिळवायचा, या विवंचनेत तो आहे. त्यांच्यासमोर आता केवळ गावाला परत जाण्याचाच पर्याय शिल्लक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना घरी जाण्यासाठी बस, रेल्वे अथवा इतर कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा वेळी काही मजूर शेकडो किलोमीटर अंतरावरील आपल्या गावाकडे पायीच निघाले आहेत. तर काहीजण सायकलवरून आपले गाव जवळ करताना दिसत आहेत.
हेही वाचा... ११ हजार आरोपींची सुटका पॅरोलवर करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शेजारील राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मजूर कामाच्या शोधात येतात. मात्र, सध्या सर्वच प्रकाराचे कामधंदे बंद झाल्यामुळे हे कामगार त्यांच्या घरी निघाले आहेत. मौदा तालुक्यातील गुरुकुल शाळेच्या बांधकामावरील मजूर, काम बंद झाल्याने मागील तीन दिवसांपासून चांगलेच अडचणीत सापडले होते. कोरानाच्या सावटामुळे शाळेने टाळे लावल्यामुळे त्यांची राहण्याची आणि जेवणाची अडचण निर्माण झाली होती. तसेच बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसांकडून फटके मिळतात. त्यामुळे शेवटी त्यांनी गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील काही रहिवासी नागपूरमध्ये होते. प्रवासासाठी कोणतेही साधन मिळत नसल्याने जवळपास 120 किलोमीटर अंतर पायीच जाण्याचा निर्णय येथील मजूरांनी घेतला. निर्णय अतिशय कठीण होता. मात्र, त्यांच्या दृष्टीने तोच हिताचा होता. म्हणून त्यांनी सकाळीच प्रवास सुरू केला. केवळ पाणी आणि बिस्कीटे खाऊन त्यांनी ही पदयात्रा सुरू केली. अशीच काहीशी परिस्थिती मध्य प्रदेशच्या कटंगी जिल्ह्यातून आलेल्या जवळपास 12 मजूरांची होती. नागपूरमध्ये बांधकाम कामगार म्हणून हे नागरिक काम करत होते. त्यांनीही घरी जाण्यासाठी खासगी वाहने शोधली. मात्र, वाहन न मिळाल्याने शेवटी सायकलने घरी परतण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या 12 जणांमध्ये 2 महिला आणि एक लहान मुलगा आहे.
हेही वाचा... कोरोनाविरोधात तीन वर्षाच्या चिमुकलीचा लढा यशस्वी
गुरुवारी सकाळी 11 वाजता निघालेली ही लोक सायंकाळी 6 वाजता भंडारा जिल्ह्यात आली. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हे सर्व तुमसर तालुक्यात पोहचणार होते. काही सामाजिक कार्यकत्यानी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. मात्र, रात्री त्यांची झोपण्याची व्यवस्था झाली नाही, तर त्यांना रस्त्यावर संपूर्ण रात्र काढावी लागणार आहे. तसेच मार्गात कोणत्याही अडचणी आल्या नाही, तरच उद्या सायंकाळपर्यंत हे सर्व मजूर आपापल्या घरी पोहचतील. मात्र, उद्भवलेली ही स्थिती त्यांची ही पायपीट त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहणार आहे..