भंडारा - साखरेपासून निर्मित पांढऱ्या शुभ्र गाठीला दरवर्षी होळीच्या सणाला भंडारा जिल्ह्यात मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी या गाठी निर्मितीवर कोरोनाचे सावट आहे. होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा होणार नाही, या भीतीने दुकानदारांनी आपल्या दुकानात दरवर्षीपेक्षा कमी माल ठेवला आहे. तर मागणी कमी झाल्यामुळे भंडारा शहरातील एकमेव गाठी उत्पादकाचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यामुळे यावर्षी या व्यवसायातून त्याला अपेक्षित नफा मिळणार नसल्याचे चित्र आहे. पूजा आणि भेट देण्यासाठी गाठीचे महत्व असते.
होळीला गाठीचे महत्व -
जिल्ह्यात होळीची पूजा करताना होळीला गाठी चढवली जाते. तसेच धुलिवंदनाच्या दिवशी लहान मुलांना रंग लावून गाठी भेट स्वरूपात दिली जाते. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असल्याने होळीच्या काळात या गाठीची विशेष मागणी वाढते. एवढंच नाही तर गुढी पाडव्याला देखील गुढी उभारतांना गाठी चढवली जाते.
कशी बनते गाठी -
ही पांढरी शुभ्र गाठी साखरेच्या पाकापासून बनते. साखरेला एका मोठ्या लोखंडी कढईमध्ये आगीवर शिजवून त्याचा पाक तयार केला जातो. हा पाक नंतर एका गाळणीच्या साहाय्याने गाळून ड्रममध्ये ठेवला जातो. त्यानंतर गाठी निर्मितीच्या आधी हा पाक पुन्हा एका विशिष्ट प्रकारच्या भांड्यात खूप गरम केल्या जातो आणि त्यानंतर लाकडांच्या साच्यांमध्ये हा गरम पाक अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने घातला जातो. काही काळ थंड झाल्यानंतर गाठ्यांची निर्मिती होते. हे कौशल्यपूर्ण काम आहे, मात्र यामधून मिळणारा नफा अगदीच कमी आहे आणि हा केवळ ठराविक दिवसांचाच व्यवसाय आहे आणि त्यामुळे या व्यवसायातून बऱ्याच लोकांनी माघार घेतली आहे. शहरात केवळ एकच व्यक्ती हा गाठी निर्मितीचे काम करत आहे. आर्थिकदृष्ट्या खूप नफा मिळत नसला तरी आजोबाच्या काळापासून सुरू असलेल्या काम असल्याने हे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे सावट -
या वर्षी मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी होळी अगदी साधेपणाने साजरी करावी, कुठे ही गर्दी करू नये किंवा धुलिवंदनाच्या दिवशी कोणाला रंग लावणे किंवा पाणी फेकण्याचे प्रकार करून गर्दी करू नये, असे आदेश काढले. या आदेशानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळीचा उत्सव साजरा करता येणार नाही, असे नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे गाठीची मागणीही कमी होईल अशी भीती दुकानदारांना वाटत असल्याने दुकानदारांनी यावर्षी केवळ 25 टक्के गाठीचा साठा त्यांच्या दुकानात केला आहे. मागणी कमी असल्याने गाठी उत्पादकाने सुद्धा त्यांचे उत्पादन हे निम्म्यावर आणले आहे. मात्र गाठी निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल त्यांनी पहिलेच आणून ठेवल्याने त्यांना यावर्षी मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - होळीच रंगीत चित्र, जाणून घ्या देशभरात कुठे, कशी साजरी केली जाते