भंडारा- जिल्ह्यातील सॅनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी येथे मालवाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगाराचा मृत्यू झाला. या कामगाराच्या कुटुंबातील लोकांनी कंपनीच्या गेटसमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाल्याने दहा लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी कुटुंबाने केली आहे.
सॅनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी येथे मालवाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने मंगळवारी रात्री १०.३५ वाजता कामगाराचा मृत्यू झाला. विकास गणवीर (वय 53 वर्ष रा. शास्त्री वार्ड वरठी) असे मृत कामगाराचे नाव आहे.
![विकास गणवीर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-bhn-01-protest-in-front-of-company-vis-7203739_23122020195455_2312f_1608733495_217.jpg)
हेही वाचा-नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं
कामगाराचा जागीच मृत्यू-
विकास गणवीर हे सॅनफ्लॅग कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामावर होते. घटनेच्या दिवशी रात्रपाळीवर ते कार्यरत होते. लोकोपायलट ट्रेनद्वारा होणारी मालवाहतूक डब्यातून येणाऱ्या मालाला वॅगन ट्रीपलरच्या मदतीने खाली करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या गाडीला इतर डब्यापासून जोडण्याचे काम सुरू झाले. यावेळी लोकोपायलटच्या चुकीने विकास दोन्ही डब्यांमध्ये अडकले. त्यावेळी विकास यांना जोरात धडक लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. मुलगी तंत्रनिकेतनलाला शिकत आहे. तर मृत कामगाराची दोन्ही मुले लहान आहेत. घरातील कर्ता हरविल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
हेही वाचा-'लढायचं असेल तर राजकीय मार्गानं लढा, ईडीच्या माध्यमातून नको'
मृत्यू झाल्यानंतरही कुटुंब राहिले अनभिज्ञ
विकास यांचे घर कंपनीपासून जवळच आहे. मात्र, कंपनीने त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबापासून लपवून ठेवली. किरकोळ अपघात झाल्याचे सांगून भंडारा जिल्हा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, कुटुंब तिथे पोहोचल्यानंतर विकास त्यांना कुठे दिसत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार विकास यांचा मृतदेह हा देवघरात अकरा वाजता कंपनीने आणून ठेवल्याचा आरोप बहीण सुरेखा हुमने यांनी केला. अपघाताची माहिती न देता परस्पर मृतदेह भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात होण्यास कंपनी व्यवस्थापन कारणीभूत असल्याचा आरोपही मृताच्या बहिणीने केला आहे. अपघाताचे मूळ कारण दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत व स्थायी नोकरी देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
मृतदेह गेटसमोर ठेवून ठिय्या आंदोलन-
शवविच्छेदन झाल्यानंतर कामगाराचा मृतदेह घेऊन कुटुंब कंपनीच्या गेट समोर आले. तिथे मागण्या करत आंदोलन सुरू केले. कंपनी आणि आंदोलकांमध्ये बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. मात्र, कंपनी नियमानुसार जे शक्य होईल तेवढेच पैसे देऊ या गोष्टीवर शेवटपर्यंत ठाम राहिली आहे. पत्नीला कंत्राटी कामगार व मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर योग्यतेप्रमाणे काम देण्याचे कंपनीने आश्वासन दिले आहे. कामगारांच्या कुटुंबियांचे आंदोलन चार तास सुरू राहिले. अखेर कंपनीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेऊन कामगाराच्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यात आले.