भंडारा - तेली समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यावेळी नागरिकांना संबोधित करताना रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 'जाती सोडा, भारत जोडा' हे घोषवाक्य दिले आहे. येणाऱ्या काळात समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. भंडारा जिल्हा तेली समाजतर्फे संताजी मंगल कार्यालयात नव्याने मंत्री झालेल्या मंत्री, खासदार यांचा सत्कार ठेवला होता. त्यावेळी ते बोलत होते.
या सत्कार सोहळ्यात रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबतच राज्यमंत्री परिणय फुके आणि नुकतेच खासदार झालेले सुनील मेंढे तसेच, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी आपल्या भाषणात क्षीरसागर म्हणाले, की देशाच्या प्रगतीसाठी जातपात सोडुन देश एकत्रीत जोडण्याचा प्रयत्न करा. देशात विविध जाती आणि धर्माचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र, बऱ्याचदा जाती-धर्मामुळे देश विभागले जातात. त्यामुळे सर्वांनी एकत्रीत येऊन देशाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपदेशाप्रमाणे समाजातील प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त शिकले पाहिजे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे, तेव्हाच समाज पुढे जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.