भंडारा - दोन महिन्यांच्या कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात शुक्रवारपासून बसेसेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, सर्व बसेस सुरू न करता प्रायोगिक तत्त्वावर 6 आगार मिळून केवळ 38 बसेस सुरू केल्या गेल्या आहेत. सकाळी 7पासून सायंकाळी 7पर्यंत या बसेस सुरू राहणार आहेत. मात्र, सकाळपासून केवळ 3 ते 4 प्रवासी एका बसमध्ये मिळत आहेत.
लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे भंडारा राज्य परिवहन विभागाचे 25 कोटींचे नुकसान झाले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागामध्ये भंडारा-गोंदिया असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यापैकी गोंदिया जिल्ह्यात या अगोदरच बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत होते. त्यामुळे आज 6 आगार मिळून केवळ 38 बसेस सुरू केल्या गेल्या. या बसेस दिवसभरात 272 फेऱ्या मारणार असून 12273 किलोमीटर अंतर त्यांना पूर्ण करायचे आहे. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण हे बस स्थानकावरच केले जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी असे चार आगार आहेत, तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या सेवा फक्त जिल्ह्याअंतर्गत राहणार आहेत. बसेस जरी सुरू झाले असले तरी बरेच नागरिकांना त्याची माहिती नसल्याने आणि कोव्हिड-19च्या भीतीने नागरिकही अजूनही घराबाहेर निघण्यास आणि प्रवास करण्यास टाळत असल्याने अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.