भंडारा - ट्रक आणि चारचाकी वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात कर्तव्यावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सुनील मेश्राम (वय 51) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ट्रकने चारचाकी वाहनाला मागून धडक दिल्याने ती गाडी मेश्राम यांच्या अंगावर आली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गडेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयासमोर गाड्यांचे निरीक्षण करत होते. रविवारी सकाळी भंडाऱ्याकडून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची तपासणी सुरू होती. पोलिसांना पाहिल्यानंतर चारचाकी गाडीच्या चालकाने पोलिसांपासून वाचण्यासाठी एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ट्रक आणि चारचाकीमधील अंतर कमी झाले. वेगात असलेल्या ट्रकने या गाडीला मागून धडक दिली. या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या सुनील मेश्राम यांना जाऊन धडक दिली.
हेही वाचा - 'ताई तुम्ही लवकर बऱ्या व्हाल, मुलांची चिंता करू नका' मुख्यमंत्र्यांनी घेतली पीडितेची भेट
या अपघातानंतर ट्रकचालक आणि चारचाकी वाहनाचा चालक या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. सुनील मेश्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा येथे आणला गेला. सुनील मेश्राम हे मागील तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मूळगावी (बेला) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.