भंडारा - जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका मुख्याध्यापकांनी शाळेतच आत्महत्या केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून मानसिकदृष्ट्या खचलो होतो, म्हणून आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. मात्र, मानसिकदृष्ट्या कोणता त्रास होता, याबाबतचा काही उल्लेख चिठ्ठीत नाही.
साकोली तालुक्यातील पळसपाणी येथे राहणारे महेंद्र मनोहर मेश्राम (वय 34) असे त्यांचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी साकोली शहरात टलएकोडी रस्त्यावर ‘बचपन प्ले’ ही खासगी शाळा सुरू केली होती. या शाळेत ते स्वतः संचालक आणि मुख्याध्यापक होते. मागच्या पाच वर्षात शाळेला त्यांनी चांगले नावलौकिक मिळवून दिले. महेंद्र हे स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या नवनवीन प्रयोग करून शाळेला वेगळे अस्तित्व मिळवून दिले होते. त्यामुळे साकोली तालुक्यात ते बरेच परिचित झाले होते.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे ते आपल्या शाळेत आले, सर्व शिक्षकांची त्यांनी आपल्या केबिनमध्ये बैठक घेतली आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मार्गदर्शनही केले. त्यानंतर मोबाईलवर बोलत ते शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीकडे गेले. बराच वेळ झाला तरी ते खाली का आले नाहीत, म्हणून काही शिक्षकांनी वर जाऊन पाहिले तेव्हा महेंद्र यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
शिक्षकांसाठी हे दृश्य प्रचंड धक्का देणारे होते. शिक्षकांनी तत्काळ त्यांना खाली काढून साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेंद्र हे अविवाहित होते, त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. शाळा व्यवस्थित सुरू असताना त्यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? याबाबत परिसरात चर्चा होत आहे.