भंडारा - जिल्ह्यात 2019-20 मध्ये पहिल्यांदाच हरभर खरेदीसाठी शासकीय आधारभूत खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात दोन ठिकाणी हे शासकीय आधारभूत केंद्र सुरू केले गेले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. आधारभूत हरभरा खरेदी केंद्रमुळे शेतकऱ्यांना कमीत कमी 1,000 ये 1,500 रुपये अधिकचे मिळत असल्याने शेतकरी आनंदित आहेत.
भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त धानाचे पीक घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र पहिल्यापासून आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना एक ठराविक दर मिळतो. मात्र, धानाच्या उत्पादनसह जिल्ह्यात हरभऱ्याचेही काही प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी किंवा दलालामार्फत शेतकऱ्यांना लुबाडलेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार शासनाने ही दोन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.
हेही वाचा... टाळेबंदीमुळे अभियंत्याची नोकरी गेली... 'तो' विकू लागला इडली...
पवनी तालुक्यातील 400 शेतकऱ्यांनी मिळून चिंतामणी फार्मा प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. भेंडाळा गावात या कंपनीच्या शेतकऱ्यांनी एक शेड तयार करून त्यामध्ये ग्रेडिंग मशीन बसवली आहे. याच ठिकाणी या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केले जाते आणि नंतर मशीनने त्याला ग्रेडिंग करून पोत्यात भरून वखार महामंडळाच्या गोदामात पाठवले जाते. आतापर्यंत 10,000 क्विंटल हरभरा खरेदी या कंपनी मार्फत झाला आहे. तर दोन्ही कंपनी मिळून 20,000 क्विंटल हरभरा खरेदी केला असून अजूनही खरेदी सुरूच आहे.
या अगोदर शेतकरी आपला हरभरा हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना विक्री करत होते. त्यामध्ये त्यांना 3,000 ते 3,500 असा दर मिळत होता. मात्र. आता शासनाने सुरु केलेल्या आधारभूत खरेदी केंद्रामध्ये 4800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबल्याने शेतकरी आनंदित आहेत. यापुढेही हे केंद्र निरंतर सुरू राहावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हरभरा केंद्रामुळे तांदुळाच्या उत्पादनाप्रमाणे हरभरा उत्पादनाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळतील. भाताच्या शेतीसह अधिकचा नफा मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी मदत होईल.