भंडारा - लॉकडाऊन दरम्यान ग्रामीण भागातील लोकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यातच रोजच्या जेवणाला लागणारा भाजीपाला घेण्यासाठीही पैसे नसायचे. हीच अडचण ओळखत माजी सरपंच प्रसन्ना चाकोले आणि मित्र परिवाराने मागील महिन्याभराच्या काळात 3500 टन भाजीपाला निशुल्क वाटला.
ग्रामीण भागातील लोकांना लॉकडाऊनकाळात बऱ्याच लोकांनी धान्य वाटप केले होते. मात्र, दररोज लागणारा भाजीपाला घेण्यासाठी काही दिवसानंतर या ग्रामीण लोकांकडे पैशांची टंचाई जाणवू लागली. ही गोष्ट लक्षात घेता माजी सरपंच प्रसन्ना चाकोले आणि त्यांच्या सहकारी भुमेश्वर चाकोले, शेरू शेख, किशोर वाडीभस्मे, दुर्वास दिवटे अशा बऱ्याच गावकरी मित्रांनी एकत्रित गराडा आणि परिसरातील इतर गावातील लोकांसाठी अंदाजे 3500 किलो ढेमस, वांगे, दुधी, कारले, भेंडी, कोथिंबीर ट्रॅक्टरमध्ये भरून घरोघरी पोहचवले. त्यामुळे मागील महिन्याभरापासून हे लोक या ग्रामीण लोकांच्या घरी दोन वेळच्या भाजीची व्यवस्था करून त्यांना लॉकडाऊन काळात जीवन जगण्यास मदत केली. विशेष म्हणजे भंडारामध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण ही यांच्याच परिसरातील होता. ते गाव कंटेंटमेंट झोन घोषित केल्यावर ते गाव वगळता बाकी इतर गावात हा भाजीपाला वाटण्यात आला.