भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांमार्फत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसह चालकांची तपासणी होत आहे. अशाच प्रकारे भंडारा ते नागपूर रस्त्यावर खराबी गावाजवळ असलेल्या पोलीस चौकीला शनिवारी सकाळी एका अनियंत्रित चारचाकीने धडक दिली. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच, चालकासह दोघे जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालक आणि सोबत असलेली व्यक्ती हे दोघेही मद्यप्राशन करून होते.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी नागपूर-भंडारा सीमेवर खराबी नाका या ठिकाणी आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी 24 तास कर्तव्यावर आहेत. शनिवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेने येणारी हुंडाई वेरणा (गाडी क्र. MH_27_AC 1231) या गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले. या गाडीने तपासणीसाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत आणि शिपाई निलेश नानरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर, गाडी चालक आणि मालक दोघांनाही उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही गाडी आयुध निर्माणमध्ये कार्यरत एका कर्मचाऱ्याची असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना धडक दिल्यानंतर गाडी सरळ आरोग्य विभागाचे कर्मचारी जेथे बसले होते, त्या दिशेने गेली. मात्र, शेवटच्या क्षणी गाडी त्यांच्या मागे असलेल्या नालीत जाऊन थांबली. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी थोडक्यात बचावले. या गाडीच्या चालकाला अटक केली आहे. तो नशेत होता का, गाडीवरील नियंत्रण कसे सुटले याबाबत चौकशी सुरू होईल.