भंडारा - तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार करून त्याचे मांस शिजवून खाणाऱ्या पाच जणांवर वन विभागाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून शिजवलेले मांस जप्त करण्यात आले, मात्र मुख्य शिकारी पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
नाका डोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. या माहितीचा आधार घेत त्यांनी चौकशी केली असता आष्टी गावात या हरणाचे मांस शिकविले जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर वन विभागाच्या पथकाने धाड घालत आरोपी योगेश शंकर शेंडे (33), योगेश योगेश नामदेव गौपले (27), गणेश घनश्याम गौपले (45, सर्व राहणार आष्टी) तर संजय श्रीराम पुष्पतोडे (38 राहणार चिखला) आणि ताराचंद सुजन कुंभारे (52 राहणार डोंगरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शिजवलेले चितळाचे मांस जप्त करण्यात आले. हे मांस प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य शिकारी फरार झाला असून त्याचा शोध वन विभाग घेत आहे. गतवर्षी वाघाच्या शिकारी पासून वनविभागाची नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात करडी नजर आहे. गावा-गावात खबरे असून त्यांच्या माहितीच्या आधारे कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात शिकारीवर आळा बसल्याचे बोलले जात आहे.