भंडारा - जिल्ह्यात आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या दमदार पावसाने शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) भंडारा जिल्ह्याच्या गोसे आणि बावनथडी या दोन्ही धरणांची दारे उघडण्यात आली आहेत. सातपैकी 5 तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली असून वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तर पुलाच्या जवळ असलेल्या ग्रामसेवक वसाहतीत पाणी शिरले असून या परिसरात रस्त्यावर 2 फूट पाणी वाहत आहे. तसेच मध्यप्रदेशला जाणाऱ्या बपेरा बालाघाट पुलावरून पाणी वाहत असल्याने मध्यप्रदेशला जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. या पुलावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे भंडारा 74 मिमी, मोहाडी 85 मिमी, तुमसर 102 मिमी, साकोली 80 मिमी आणि लाखनी 78 मिमी अशी पाच तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावर तीन फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक मोठ्या पुलावरून वळविण्यात आली असल्याने या पुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहान पुलाशेजारी असलेल्या ग्रामसेवक वसाहतीमध्ये पुराचे पाणी गेले आहे. तसेच या परिसरातील रस्त्यांवर 2 फूट पाणी वाहत आहे.
हेही वाचा - स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचा बहाणा; पोलीस निरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार
दमदार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्प पहिल्यांदाच 100 टक्के भरला. या प्रकल्पाची चार दारे उघडण्यात आली आहेत. मागील 24 तासात 116 मिमी पावसाची नोंद धरण परिसरात झाली आहे. सकाळी सात वाजता धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी 60 सेंटिमीटरने उचलण्यात आले असून यामधून 402 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे या परिसरातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बावनथडी नदीवरील पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्यामुळे मध्यप्रदेशला जाणारा बालाघाट मार्ग सध्या तरी बंद आहे.
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे गोसे धरणाच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गोसे धरणाची 33 दारे उघडण्यात आली आहेत. यापैकी 25 दारे तीन मीटरने तर ८ दारे अडीच मीटरने उघडण्यात आली असून यामधून 19 हजार 184 मिमी पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील सर्व गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - चिंताजनक..! गोंदियात वाढतोय कुपोषणाचा आकडा