भंडारा - लाखनी तालुक्यात सिंधी लाइन परिसरात एका फटाका सेंटरला आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग इतकी भीषण होती की त्यात फटका सेंटरच्या बाजूला असलेल्या नागराज फूलवाला यांचेही दुकान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. लाखनी नगर पालिकेच्या अग्निशामन दलाने ही आग 2 तासानंतर आटोक्यात आणली.
कशी लागली आग ?
लाखनी येथील सिंधी लाईन परिसरात अनेक दुकाने आणि घरे आहेत. याच परिसरात मेहर यांचे अंबिका नावाने फटाका सेंटर आहे. रात्री जवळपास 12 वाजेनंतर या दुकानातून आगीचे धूर निघताना नागरिकांना दिसले. हे फटाक्यांची दुकान असल्याने काहीच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दल दाखल होण्याआधीच आग शेजारी असलेल्या दुकानालाही लागली.
यंत्रणेची तपासणी करुन दुकानांना परवानगी
लाखनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर विझवली आहे. मात्र तोपर्यंत दोन्ही दुकांनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्रीची वेळ असल्याने दुकानात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शार्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर फटाका सेंटरमध्ये सुरक्षेचे नियमानुसार सर्व यंत्रणा असल्याची तपासणी करूनच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.