भंडारा - कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी होम क्वारंटाईन केल्यानंतरही अनावश्यक जिल्ह्यात फिरणाऱ्या 3 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
पवनी तालुक्याच्या माडगी येथील होम क्वारंटाईन व्यक्तीने नियम तोडले म्हणून अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये तर मोहाडी येथील होम क्वारंटाईन व्यक्ती पान टपरीवर आढळल्याप्रकरणी मोहाड़ी पोलीस स्टेशनमध्ये आणि लाखंदूर तालुक्यातील मोठी दीघोरी येथील होम क्वारंटाईन व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात अजून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, विदेशातून आलेले लोक असतील तसेच कोरोना संक्रमित इतर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन तसेच इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले गेले आहे. संशयित लोकांचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले आहेत. मात्र, काही होम क्वारंटाईन नागरिक या विषयाला गांभीर्याने घेत नाहीत. म्हणूनच शेवटी या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.