भंडारा - लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकांनी आपल्या घरीच राहावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, तरीही काही लोक जे कामानिमित्त आपल्या जिल्ह्याबाहेर गेले होते, त्यातील काही लोक परत त्यांच्या गावी आले आहेत. अशा लोकांना होम क्वारंटाईन केले गेले तर काही लोकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहे. मात्र, अड्याळ येथील काही नागरिकांना होम क्वारंटाईन केल्यावर त्यांची नावे आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अड्याळ येथे बाहेर गावावरून काही नागरिक परतले. याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच त्यांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यांना सर्दी, खोकला या सारखे कोणतेही लक्षण दिसले नाही. तरी खबरदारी म्हणून नियमाप्रमाणे त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, ज्या रुग्णवाहिकेतून हे लोक गावात येताच काही नागरिकांनी अॅम्ब्युलन्ससहित त्यांचे फोटो काढले व ते फोटो आणि नावे अड्याळ येथील ग्रामसेवकाने वायरल केले. याप्रकरणी काही नागरिकांनी अड्याळ पोलिसात ग्रामसेवकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अड्याळ पोलिसांनी कलाम ५०१, ५०५ सोशल मीडियावर अफवा फसरवणे, या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.