भंडारा - लॉकडाऊनने कांदा उत्पादकांना रडविल्यांचे पाहायला मिळत आहे. बाहेरून आलेल्या कांदा उत्पादकांना भंडारा जिल्ह्यात ग्राहक मिळेनासा झाला आहे. लोकांकडे पैसा नसल्याने कांद्याची मागणी कमी झाली असून केवळ 10 रुपये किलो दराने कांदा विकल्या जात आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे अजिबात मागणी नसल्याचे उत्पादकांनी सांगितले.
दरवर्षी अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जीवरून कांदा उत्पादक शाहिद शेख विक्रीसाठी भंडारा जिल्ह्यात येतात. यावर्षीही ते 1 हजार किलो कांदा विक्रीसाठी घेऊन आले. रस्त्याच्या कडेला कांद्याचे कट्टे लावून त्याची विक्री केली जाते. दरदिवशी शहराच्या विविध भागात मुख्य चौकाच्या शेजारी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत विक्री केली जाते. तसेच शक्य तेवढा कांदा येथील ठोक कांदा व्यापाराला विकला जातो. मात्र, लॉकडाऊनमुळे रोजगार, व्यापार बंद असल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी कांद्याला पाहिजे तशी मागणी नाही. त्यामुळे उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे.
कांदा उत्पादकांची निराशा झाली असून अपेक्षित भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील विविध गावागावात, गल्लोगल्ली फिरून कांदा 10 रुपये किलो प्रमाणे 40 किलोच्या कट्ट्याचे 400 रुपये भाव पाडून विक्री सुरू आहे. दरवर्षी एका दिवशी 45 ते 50 कट्टे विकले जात होते. मात्र, आता लॉकडाऊनमुळे खरेदी कमी झाली असून दरदिवशी 20 कट्टे विकले जात असल्याची खंत कांदा उत्पादकाने व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर त्यांनी विक्रीसाठी आणलेला संपूर्ण कांदा विकला जाणार नाही आणि कालांतराने तो खराब होईल. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे या कांदा उत्पादकाने सांगितले आहे.