भंडारा- जिल्ह्यातील कोसरा गावातील एका शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नापिकी आणि बँकांचे कर्ज न फेडता येण्याच्या विवंचनेत त्यांनी हे पाऊच उचलल्याचे समजते आहे. विष्णू शेंडे (व. ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
विष्णू शेंडे यांनी लोकांकडून यावर्षी काही पैसे उसने घेतले होते. त्या पैशातून त्यांनी ३ एकर शेतीमध्ये धान्याची लागवड केली. मात्र, मागील १० दिवसांमध्ये पवनी तालुक्यात ३ वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे सखोल भागातील शेतांमध्ये पाणी साचले. यावेळी शेंडे यांच्या शेतातही पावसाचे पाणी साचले. पाणी साचल्यामुळे धान्याची रोपे सडली असून विष्णू यांना नापिकीची चिंता सतावली. नापिकीमुळे लोकांकडून व बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार या विविंचनेत ते होते. त्यामुळे विष्णू शेंडे यांनी आपल्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.