भंडारा - कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दर मिळत नसल्याने मोहाडी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटो आणि वांग्याचे जवळपास 4 लाखांचे संपूर्ण पीक उपटून टाकले.
बाजारात 50 पैसे किलो प्रमाणेही कोणी व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया या शेकऱ्याने दिली आहे. मोहाडी तालुक्यातील खरबी या गावात दिनेश देशमुख यांची 10 एकर शेती आहे. या शेतीमध्ये डिसेंबर महिन्यात 2 एकरावर त्यांनी वांगे आणि टमाटर यांची लागवड केली होती. सुरवातीचे 3 तोडे त्यांच्या मालाला चांगला दर मिळाला. मात्र, संचारबंदी सुरू होताच शेतमालाला बाजारपेठेतून मागणी कमी झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी करणे बंद केले. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला. ठोक बाजारात वांग्याला 50 पैसे प्रति किलो दर मिळणे कठीण झाले. दिनेश देशमुख यांनी रविवारी बाजारात विक्रीसाठी नेलेली वांग्याची 15 पोती, विक्री न झाल्याने फेकून द्यावी लागली. तसेच मजुरांच्या तोडणीचा आणि बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही देशमुख यांना करावा लागला.
भाजीपाला फेकावा लागला आणि इतर खर्चही करावा लागल्यामुळे पुढे काय करावे, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने सोमवारी काही मजूर घेऊन हाता तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उपटून काढले. ही संचारबंदी नसती, तर देशमुख यांना पुढच्या 2 ते 3 महिन्यात अंदाजे 3 ते 4 लाखांचे उत्पादन अपेक्षित होते. संचारबंदीचा फटका आम्हा शेतकऱ्यांना बसत असून शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्या होणाऱ्या नुकसानीचे सर्व्हे करून काही मदत मिळाल्यास चांगले होईल, अन्यथा शेतकऱ्यांना जगणे कठीण जाईल, असे मत या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.