भंडारा - पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, डॉक्टर आणि नर्सच्या अभावामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक खंडाईत यांनी सांगितले.
पावसाळ्यात गॅस्ट्रो, अतिसार, मेंदूज्वर, विषमज्वर, डेंग्यू, स्वाइन फ्लू, यांसारख्या विविध साथीच्या आजारांची लागण होते. त्यामुळे या पावसाळ्यात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
गेल्या जून महिन्यापासून भंडाऱ्यात साथीच्या रोगाने मान वर काढली आहे. आतापर्यंत गॅस्ट्रोचे 2123, डिसेंट्रीचे 58, अतिसाराचे 479, कावीळचे 3, विषमज्वराचे 364, गोवरचे दोन, चिकन पॉक्सचा एक आणि डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांवर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जून 2019 ते 17 जुलैपर्यंत या साथीच्या रोगांमुळे एकही रुग्ण दगावलेला नाही.
या सर्व आजारांचे मुख्य कारण अस्वच्छ पाणी आहे. या काळात पाणी नेहमी उकळून प्यावे, अस्वच्छ पाणी म्हणजे या आजारांना आमंत्रण होय, तसेच कुलर, आणि इतर ठिकाणी पाणी साचलेले नसावे. या साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे मच्छर निर्माण होतात. त्यामुळे पाणी साचलेले नसावे, असे डॉक्टरांनी सांगितले.
गॅस्ट्रो आणि अतिसारच्या रोगांसाठी रुग्णालयांमध्ये वेगळी व्यवस्था आहे. तसेच स्वाईन फ्ल्यू सारख्या रुग्णांसाठी विशेष खोली राखीव ठेवली जाते. भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय मिळून दहा रुग्णालये आहेत. यामध्ये दोन उपजिल्हा रुग्णालये आणि सात ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच पी. एस. सी. आणि सब सेंटरसुद्धा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या सर्व ठिकाणी या रोगावर उपचार करण्यासाठी व्यवस्था आणि औषधांचा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.
रुग्णालय आणि औषध उपलब्ध असले तरी डॉक्टर्स आणि नर्स यांचा तुटवडा असल्याने रुग्णांना उपचार देताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्ह्यामध्ये डॉक्टरचे वर्ग एकचे 22 पदे रिक्त आहेत. तर वर्ग 2 ची 12 पदे रिक्त आहेत. सर्वाधिक तुटवडा स्टाफ नर्सचा आहे. जिल्ह्यात स्टाफ नर्सची 301 पदे मंजूर असून केवळ 195 पदेच भरली गेली आहेत. तर 106 पदे रिक्त आहेत.
आम्ही आमच्या परीने योग्य तो उपचार आणि रुग्णांची सेवा करतो. पण पदे रिक्त असल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मंजूर पदे भरली जायला हवीत. यामुळे रुग्णांची योग्य सेवा करून त्यांना उपचार देता येतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक खंडाईत यांनी दिली.