भंडारा - अतिक्रमणाचा आव आणून घर पडणाऱ्या सरपंचाच्या आणि नायब तहसीलदारांच्या विरोधात सोमवारी मोहाडी येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी लोकांना तहसीलदार यांनी 29 तारखेला विषय निकाली काढू असे आश्वासन देऊन मोर्चा संपविला. तहसीलदार यांचे या प्रकरणातील हे तिसरे पत्र आहे. पाहिल्या दोन पत्राप्रमाणे यावेळीही केवळ आंदोलनाची हवा काढण्यासाठी वेळकाढूपणा केल्याचे बोलले जात आहे. मोर्चानंतर कोणताही ठोस निर्णय हाती न आल्याने हे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी केल्याची चर्चा शहरात आहे.
30 मे ला मोहाडी तालुक्यातील सिरसोली गावातील शिवदास लिल्हारे यांचे घर अतिक्रमणामध्ये असल्याचे कारण पुढे करत सरपंच आणि नायब तहसीलदार यांनी संपूर्ण जमीनदोस्त केले होते. त्यानंतर आपल्या न्याय, हक्कासाठी शिवदास लिल्हारे आपल्या मुलासह तहसील कार्यालयापुढे उपोषणाला बसले आहेत.
त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि गावकरी एकत्रित जन आक्रोश मोर्चा चे आयोजन केले होते. या मोर्चात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले, माजी खासदार मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, राजू कारेमोरे, नरेश डहारे यांनी सहभाग घेतला होता. मोर्चा चौंडेश्वरी मंदिरापासून निघून मोहाडीच्या विविध भागातून मोहरी तहसील कार्यालयाजवळ पोहोचला. नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेमध्ये विविध नेत्यांनी आपल्या भाषणात या क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांच्यावर आगपाखड केली. संपूर्ण प्रकरणात क्षेत्राचे भाजप आमदार चरण वाघमारे यांचाच हात असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तहसीलदार देशमुख हे स्वतः निर्णय घेत नसून आमदार चरण वाघमारे यांच्या आदेशानुसार निर्णय घेऊन कार्य करीत असतात. त्यामुळे मागील वीस दिवसांपासून या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याचे नाना पटोले आणि सभेला संबोधित करताना सांगितले.
सभा पाच वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर तहसीलदार देशमुखांनी मोर्चेकर्यांना एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी 29 तारखेपर्यंत योग्य ते निर्णय घेण्याचे लिहून दिले. मात्र, तहसीलदार देशमुख यांनी याच प्रकरणात याअगोदरही पीडित शिवलाल लिल्हारे यांना प्लॉट देण्याचे, घर बांधून देण्याचे आणि ज्या नायब तहसीलदारांनी घर पाडण्याचे चुकीचे आदेश दिले त्यांच्याकडून पाच लाख रुपये दंड वसूल करण्याचे आदेश काढले. मात्र, नंतर आदेश रद्द करून ज्या लोकांनी आंदोलन केले होते त्यापैकी अकरा लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे आज झालेल्या आंदोलनाला शांत करण्यासाठी हे पत्र देऊन आंदोलनाची हवा काढली आहे. 29 तारखेपर्यंत लिल्हारे यांना न्याय मिळाला नाही तर तीस तारखेला यापेक्षाही मोठा आंदोलन करू असे नाना पाटील यांनी सांगितले.