भंडारा - भाजप सरकारच्या राजवटीत बेरोजगारीचा दर सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार देशातील लाखो युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी येथे केला. राज्यात वाढलेली बेरोजगारी आणि पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गातील तरूणांना वगळल्याच्या विरोधात सोमवारी पटोले यांच्या नेतृत्वात एनएसयुआयच्या तरुण-तरुणींनी बेरोजगार मोर्चा काढला होता. या सर्व गोष्टींना जबाबदार असलेल्या भाजप शासनाला येत्या निवडणुकीत मतदार नक्कीच उत्तर देतील असेही पटोले यांनी म्हटले.
हेही वाचा - माणूस आरक्षणाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो - नितीन गडकरी
एकीकडे २०२० मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्ने दाखविली जात असताना दुसरीकडे देशात सध्या लोकशाहीविरोधी वातावरण तयार झाले आहे. देशाची परिस्थिती पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने सुरु आहे. भारत हा युवकांचा देश आहे. मात्र, तरी देशातील कोट्यावधी युवक फक्त नोकरी नसल्यामुळे बेरोजगार म्हणून जीवन जगत असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा दिल्लीवर परिणाम नाही'
राज्यात 45 लाख तरुण बेरोजगार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन एनएसयूआय व युवक काँग्रेसने युवकांची चळवळ उभी करून बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता शास्त्री चौक येथून त्रिमूर्ती चौकपर्यंत बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी चौकात आल्यानंतर मोर्चा नंतर इथे सभाही झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये ओबीसीसाठी अजिबात जागा नसल्याने जिल्ह्यातील लोकांवर हा अन्याय आहे. यासाठी आम्ही लढा देऊ आणि वेळ पडल्यास ही भरती रद्द करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.