भंडारा - पूर्व विदर्भातील एकमेव शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये यावर्षी विद्यार्थांना प्रवेश घेता येणार नाही. गेल्या 57 वर्षांपासून शिक्षक घडविणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या ( Government Teachers College in Bhandara District ) गलथान कारभारामुळे ( Mismanagement of Government Teachers College ) यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेपासून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. नागपूर विद्यापीठात ( Nagpur University ) महाविद्यालयाची संलग्नताच नसल्याने संचालक उच्च शिक्षण पुणे ( Director Higher Education Pune ) यांनी भंडाऱ्याच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाचा समावेश पसंती क्रमासाठी जाहीर केलेल्या राज्यातील अध्यापक महाविद्यालयांमध्ये केलेला नाही. झालेला हा घोळ महाविद्यालय प्रशासन स्तरावरचा असला तरी, त्याची जबाबदारी घेण्यास मात्र कुणीही तयार नाही. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची चांगलीच कुचंबना झाली आहे.
महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी - 1965 पासून भंडारा येथे शासकीय अध्यापक महाविद्यालय कार्यरत आहे. पूर्व विदर्भातील एकमेव महाविद्यालय असलेल्या या ठिकाणाहून अनेक शिक्षक तयार होऊन बाहेर पडले. शासकीय महाविद्यालय असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी शुल्कात प्रवेश मिळतो. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी प्रवेशाची असलेली क्षमता पूर्ण होते. सीईटी प्राधिकरणाच्या माध्यमातून या बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश ( Admission to B Ed Course ) मिळावा म्हणून प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची महाविद्यालय टाकता यावीत म्हणून उच्च शिक्षण संचालक कार्यालयाच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व अध्यापक महाविद्यालयांची यादी ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित केली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य होते. ही महाविद्यालय पात्र ठराविक यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता महाविद्यालयांना करावी लागते. संबंधित विद्यापीठाची त्या महाविद्यालयाची संलग्नता ( affiliation ) असणे बंधनकारक आहे. महाविद्यालयाची संलग्नता मिळविणे ही महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी तसा प्रस्ताव महाविद्यालयाकडून पाठवावा लागतो. नियमानुसार अपेक्षित असलेले शुल्क भरल्यानंतर विद्यापीठाची एक समिती घेऊन सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतर महाविद्यालयाला संलग्नता देते.
भोंगळ कारभार उघड - भंडारा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाची संलग्नता 2021 - 22 याच शैक्षणिक वर्षापूर्वी होती. त्यामुळे 22 - 23 या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता मिळविणे गरजेचे होते. परंतु हे कामच महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले नाही. याच कारणाने संचालक उच्च शिक्षण कार्यालयाच्या वतीने भंडाराच्या अध्यापक महाविद्यालयाला प्रवेशासाठी पात्र असलेल्या महाविद्यालयाच्या यादीतून काढण्यात आले. प्रवेशाची पहिली फेरी झाली. त्यात महाविद्यालयाला प्राधान्यक्रम देताना भंडारा येथील अध्यापक महाविद्यालयाचे नाव दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. त्यानंतरच महाविद्यालय प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला. महाविद्यालयाने नवीन वर्षाच्या संलग्नतेसाठी प्रस्तावत विद्यापीठाकडे अजून पर्यंत पाठविलेला नाही. हा घोळ उघड झाल्यानंतर महाविद्यालयात जागे होऊन सावरा सावरीला लागले आहे. महाविद्यालयातील प्राचार्य कर्मचारी या विषयाला घेऊन एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी, यामुळे मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तो पर्यायाचन सापडल्याने नाईलाजास्तव खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीत महाविद्यालय प्रशासकीय निष्काळजीपणे कसे वागू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
प्राचार्यांना अर्धांगवायू - या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील हे अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. ते स्वतः कुठलेच काम सहजतेने करू शकत नाही. बोलनेही शक्य होत नाही. त्यांच्या या परिस्थितीचा परिणाम प्रशासकीय कामावर होऊन त्यातूनच हा सर्व घोळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राचार्यांचा त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे यातून सिद्ध होते.
चूक माझी, लीपिकाची कबुली - संलग्नता प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी असलेले महाविद्यालयाचे कारकून विजय बावणे यांना याविषयी विचारले असता बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकले नाही. मात्र ही चूक माझ्याकडून झाल्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला मी जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. मात्र शेवटी या सर्व घोळाची जबाबदारी कुणाची हा प्रश्न प्राचार्यांच्या कार्यक्षमते कडेच बोट दाखवितो. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि शिक्षक होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नक्कीच कारवाई व्हावी अशीच अपेक्षा आहे.