भंडारा - जिल्ह्यातील मोहाडी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना चावा घेतला आहे. चावा घेतलेल्यांपैकी ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोहाडी शहरात शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी या कुत्र्यांनी १२ जणांना चावा घेतला आहे. जखमींवर मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
निरंजन चुटे, देवानंद पाटील, अब्दुल सलाम, सदाशिव कामरकर यांच्यासह आणखी ५ लोकांना या कुत्र्याने जखमी केले आहे. तर ३ लोकांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
गंभीर जखमींमध्ये रामदयाल गिरीपुंजे, अनिल बालपांडे, निरंजन चुटे यांचा समावेश असून नागरिकांमध्ये कुत्र्याची चांगलीच दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्यांकरिता स्थानिक नगर पंचायतीने उपाययोजना करायला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. मुख्याधिकारी सुट्टीवर गेले असल्यामुळे मोहाडी नगर पंचायतीचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. त्यामुळे आता शहरातील भटक्या कुत्र्यांवर कोण उपाययोजना करेल, असा प्रश्न मोहाडी येथील नागरिक विचारत आहेत. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.