भंडारा - येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने कार्यालय सतत खाली असते. कार्यालयाची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. तसेच इमारतीच्या सभोवताल काटेरी झाडे झुडपांचे जंगल निर्माण झाले आहे. यासर्वांचा त्रास इथे येणाऱ्या शेतकऱ्यांना होत असून हे कार्यालय एकतर सुरू करावे किंवा पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, योजनांची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे, असे महत्त्वाचे कार्य या मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून होत असतात. यासाठी एक मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि शिपाई या कार्यालयात असतात. मात्र, जिल्ह्याच्या या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शासनाने दिलेल्या लक्षाची पूर्तता होत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
येथील कृषी सहायक पदाच्या १२ जागांपैकी केवळ ८ जागा भरलेल्या आहेत. तर, कृषी पर्यवेक्षकांच्या दोन्ही जागा खाली आहेत. एकमेव असलेला शिपाई तालुका कृषी विभाग पाठविला गेला आहे. तसेच, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे कार्यालय वाऱ्यावर असल्याचे अनुभव शेतकऱ्यांच्या वाट्याला नेहमीच येत आहे. अधिकारी येथे कार्यालयाच्या दैनंदिन कालावधीत थांबत नसल्याने तिथे अस्वच्छता व सगळीकडे घाण झालेली आहे. तसेच, कार्यालयाची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून ती कधीही ढासळू शकते मात्र, याकडे प्रशासन कानाडोळा करत आहेत. आतील ऑफिसमध्ये कागदपत्रांना उधळीने खाऊन टाकले आहे असून जिकडेतिकडे मातीचे ढिगारे झाले आहेत. तर, घाणीमुळे उंदरांनीसुद्धा या ठिकाणी आपले बस्तान मांडलेले आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषीच्या विविध योजनांची माहिती मिळत नाही.
हेही वाचा - खर्रा दिला नाही म्हणून फोडलं डोकं, आरोपीवर गुन्हा दाखल
जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी कार्यालय असून मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक हे तालुका कार्यालयात बसत असल्याने कार्यालयीन वेळेत ते जिल्हा कार्यालयात त्यांची अनुपस्थिती असते. शेतकऱ्यांना एखाद्या आवश्यक कामाकरिता आल्यानंतर कार्यालयातील खाली खुर्च्यांना भेट देऊन पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली फसगत त्वरित थांबवून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गांनी केली आहे. तसेच, येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याविषयीची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून लवकरच आणखी कर्मचारी येणार आहेत, त्यानंतर कामात गोंधळ होणार नसल्याचे मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - भंडारा : कडाक्याच्या थंडीने चौघांचा मृत्यू