भंडारा- जिल्ह्यात आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या शेताचे सर्वे करून झालेल्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. तर, सर्वे सुरू असून त्यानंतर शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले हे सांगता येईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी (११ सप्टेंबर) जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस आला. ज्या भागांमध्ये हा पाऊस आला त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची पिके वादळ वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. शेतात पाणी शिरल्याने पिकांना नुकसान झाले आहे. त्यामुळे, आता भात पीक वाढणार नाही आणि उत्पादनात घट होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
या वर्षी पावसाने सतत शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे, शेतकरी चिंतेत होता. नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला. या सर्व अडचणींना तोंड देत शेतकऱ्यांनी कसेबसे पीक उभे केले. मात्र, परतीच्या पावसाने हे पीक हिरावून नेले.
बियाणे, पेरणी, लावणी, शेतीची मशागत, मजुरांचा खर्च, खतांचा खर्च, औषधांचा खर्च या सर्व खर्चांमुळे शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना या सर्वगोष्टींसाठी एकरी जवळपास २० हजार रुपये खर्च येतो. तर, व्यवस्थित उत्पादन आल्यास एकरी १३ ते १५ क्विंटल पर्यंत उत्पादन येते. म्हणजे एकरी जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांचा उत्पन्न मिळतो. मात्र, या वर्षी परतीच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या उत्पादनात जवळपास ३० ते ५० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, पहिलेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे आर्थिक फटका बसणार आहे.
पावसामुळे शेतात पाणी साचले असल्याने ते काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, जी पिके खाली पडली आहेत त्यांना पुन्हा उभे करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे, कृषी विभागाच्या लोकांनी शेतात येऊन सर्वे करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सध्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणे सुरू असून सर्वेनंतर नेमके किती नुकसान झाले ते समजेल.
हेही वाचा- मेकॅनिकल अभियंता तरुणीने निवडला वेगळा मार्ग; गॅरेजमध्ये करतीय ट्रॅक्टर रिपेरिंग