भंडारा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे गाव पातळीवरच तपासणी केल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती लक्षात येऊ शकेल. तसेच त्यामुळे उपचाराची दिशा ठरवण्यास सरकारला मदत होईल, असे मत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत असताना मांडले असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते आज भंडारा येथे बोलत होते.
हेही वाचा... 'मास्कचा वापर छत्रीसारखा करू नका'
गाव पातळीवरच कोरोनाची तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजचा स्टॉफ आणि प्रशिक्षणार्थी यांची टीम तयार करून तपासणी करावी, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. नागपूरमध्ये ४, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया या ठिकाणी प्रत्येकी एक मेडिकल कॉलेज आहेत. याचा फायदा चाचणी करण्यासाठी होईल, असेही पटोले यांनी सांगितले. आज (बुधवार) भंडारा येथे कोरोना प्रादुर्भावापासून बचावाचा आढावा घेण्याकरीता आयोजीत बैठकीला ते आले होते. यासोबत त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा सुध्दा आढावा घेतला. याप्रसंगी आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित होते.