भंडारा - शहरातील एका कंत्राटदाराचा त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मृताने दिलेले एक लाख रुपये परत करण्याची इच्छा नसल्याने आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचला. घटनेच्या बारा तासाच्या आत पोलिसांनी 2 आरोपींना शोधून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. नीलकंठ फगो बाहे (वय 54 राहणार खात रस्ता भंडारा) असे मृताचे नाव आहे.
नीलकंठ बाहे हे बीएसएनएल विभागात खासगी कंत्राटदाराचे काम करायचे. बुधवारी संपूर्ण दिवसभराचे काम आटपून सायंकाळी घरी परतले. घरी येऊन हातपाय धुवून झाल्यानंतर पुन्हा बाहेर जाण्याचा त्यांचा दररोजचा नित्यनियम होता. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान ते घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते कधीही परत आले नाही. घरच्यांनी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात दिली होती.
दवडीपार परिसरात एका कॅनलमध्ये आढळला मृतदेह
कारधा ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दवडीपार गावाच्या हद्दीत एका कॅनलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती कारंजा पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठून तपासणी केली असता या व्यक्तीचा खून झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले. मृताच्या जवळ मिळालेल्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबातील व्यक्तीशी संपर्क करण्यात आला आणि त्याची ओळख पटविण्यात आली.
आरोपीने मृताकडून एक लाख रुपये घेतले होते
मृतक नीलकंठ बाहे हे कंत्राटदार असल्याने आरोपी फुलचंद सुखराम बांते वय 48 वर्ष राहणार ओम नगर, खोकरला जिल्हा भंडारा हा त्यांच्याकडे मागील कित्येक वर्षांपासून काम करायचा. त्यामुळे यांचे घरोब्याचे संबंध होते. आरोपी फुलचंद बांते यांनी मृतक नीलकंठ बाहे यांच्याकडून एक लाख रुपये हातउसने घेतले. मात्र, ठराविक कालावधीत तो पैसे तो परत करू शकला नाही. त्यामुळे पैसे परत करण्याच्या कारणावरून आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये नेहमी भांडण व्हायचे.
दारू पाजून नंतर केली हत्या
बुधवारी नीलकंठ बाहे हे घरून बाहेर पडले तेव्हा आरोपी फुलचंद बांते आणि त्याचा साथीदार तेजराम अरुण धुर्वे वय 34 वर्ष हे दोघेही नीलकंठ यांना भेटले. त्यानंतर या तिघांनीही दारू घेतली आणि मी तुझे पैसे परत करतो, असे सांगून आरोपीने नीलकंठ यांना दवडीपार येथील कॅनलकडे आणले. तिथे मृत निळकंठचा गळा दाबून आणि एका धारदार दगडाने त्याच्या चेहऱ्यावर वार करत त्याची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर नीलकंठ यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन (अंदाजे किंमत दीड लाख रुपये) सुद्धा आरोपींसोबत घेऊन गेले होते.
घटनेच्या काही तासाच्या आत कारधा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून आरोपी फुलचंद बांते आणि तेजराम धुर्वे या दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उधारीचे पैसे नेहमी परत मागत असल्याने आणि त्याच्या गळ्यात असलेल्या सोन्याचा गोप हवा होता, म्हणून मागील 8 दिवसापासून हत्येचा प्रयत्न सुरू होता. शेवटी बुधवारी त्याची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.