भंडारा - ईंधन दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी भंडारा शहरात मिस्कीन टॅंक परिसरात पेट्रोल पंपसमोर भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - सिलेगाव येथील ग्रामसेविका आणि महिला ग्रामपंचायत सदस्यात हाणामारी
मोजक्या लोकांत आंदोलन
मागील कित्येक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर दिवसागणिक वाढत होते. सिलेंडरच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. ही दर वाढ काँगेसला मान्य असल्याचे दिसत आहे, असे माध्यमांनी नाना पटोले यांना विचारल्यानंतर रविवारी नाना पटोले यांनी गोंदियामध्ये इंधन दरवाढीचा निषेध करू, असे सांगितले. नेत्यांच्या आदेशाचे पालन करीत आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक जवळील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. केवळ 20 ते 25 लोकांच्या या आंदोलनात सहभाग होता.
नरेंद्र मोदी भस्मासूर असल्याचे पोस्टर लक्षवेधी
आंदोलनकर्त्या लोकांनी हातात वेगवेगळे बॅनर घेतले होते. पेट्रोल-डिझेल शंभरीपार मोदी बस्स करा जनतेची लूट मार, मोदी सरकारचा निषेध असो, असे बॅनर लावून निषेध केला गेला. मात्र, लक्षवेधी ठरत होते ते नरेंद्र मोदी यांचे महागाईचे भस्मासूर असलेले पोस्टर.
इंधन दर वाढवून नागरिकांची लूट
आधीच कोरोनाच्या दोन लाटेत टाळेबंदी लावून सरकारने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले. केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलची आणि सिलेंडरची ज्या पद्धतीने दरवाढ केली ही क्रुर थट्टाच असल्याच्या आरोप काँग्रेसने केला असून या सर्वांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. 2014 मध्ये काँग्रेस सत्तेत होते तेव्हा जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 109 प्रति डॉलर होते आणि पेट्रोलचे दर 75 होते, तरी नरेंद्र मोदी आणि भाजप पेट्रोल दर कमी करा, ही दर वाढ म्हणजे केंद्राचे अपयश आहे, असे सांगून आंदोलन करीत होते. आज भाजपच्या काळात कच्चा तेल केवळ 65 डॉलर असूनही पेट्रोल 102 आणि डिझेल 92 रुपयांवर पोहचले आहे. आता कुठे आहेत नरेंद्र मोदी आणि भाजप वाले. आता खऱ्या अर्थाने लूट होत आहे. नरेंद्र मोदी यांनी नागरिकांची लूटमार बंद करून ही दर वाढ कमी करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांतर्फे करण्यात आली.
हेही वाचा - भंडारा जिल्ह्यात सोमवारपासून सर्वच दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत राहणार खुली