भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन भंडारा जिल्हाधिकारी यांनी 200 नवीन सिलिंडरची ऑर्डर केली असून सध्या भंडारा जिल्ह्यात गरजेनुसार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.
जिल्ह्यात गुरुवारी विक्रमी 291 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3 हजार 478 वर पोहोचली असून आतापर्यंत 2 हजार 47 जण बरे झाले आहेत. तर 1 हजार 357 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 74 लोकांचा या कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर 177 लोकांवर आयसोलेशन वार्डात सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या कार्यकाळात सर्वात जास्त गरज आज भासत आहे ती ऑक्सिजनची. बऱ्याच कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणी अचानक वाढलेली आहे. कोरोना सुरु होण्याअगोदर जिल्ह्यात दररोज 25 सिलिंडरची मागणी होती. आता ही मागणी वाढून सध्या 100 ते 125 ऑक्सिजनचे सिलिंडर लागत आहेत. पुढे ही मागणी वाढून तीनशे ते साडेतीनशे सिलिंडरपर्यंत जाऊ शकते.
सुरुवातीला एका सिलिंडरवर 300 ते 350 रुपये खर्च येत असे. मात्र, ऑक्सिजन लिक्विड बनविणाऱ्या कंपनीने वाढत्या मागणीनुसार दर वाढवले. तर, नागपूरमध्ये संपूर्ण विदर्भातून सिलिंडर रिफिल करण्यासाठी येतात, त्यामुळे लांब रांगा लागतात. शिवाय, गाडीमालक यांनीही पैसे वाढविले आहेत. त्यामुळे आज 500 ते 550 रुपये खर्च येत आहे. तर, सरकारला ठरलेल्या दरात 380 रुपयांत पुरवठादार हे सिलिंडर पुरवत आहेत. मात्र शासकीय रुग्णालयाव्यतिरिक्त इतर लोकांना लागणारे सिलिंडर देणे शक्य होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत असल्याचे पुरवठादारांनी सांगितले.
सध्या जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात जवळपास 215 सिलिंडर आहेत. मात्र, रुग्णांची वाढती मागणी लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी 200 नवीन जम्बो सिलिंडरची ऑर्डर दिली आहे. रुग्णालयाजवळ 377 मध्यम सिलिंडर असून दररोज पावणे तीन क्युबीक मीटर ऑक्सिजन लागत आहे आणि मागणीनुसार सध्या ऑक्सिजन सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
संपूर्ण विदर्भात नागपूर येथून सिलिंडर रिफिल केले जातात. सध्या नागपूरला रुग्णसंख्या वाढत असल्याने आधी नागपूरला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नंतरच भंडारा जिल्ह्याला ऑक्सिजनचे सिलिंडर रिफिल करून मिळतात. जिल्ह्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भविष्यात ऑक्सिजनचा तुटवढा भासू नये व ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर व्हावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 200 जम्बो सिलिंडर मागवले आहेत. तसेच जिल्ह्यातील सनफ्लॅग कंपनीला ऑक्सिजन तयार करून रिफिल करून देण्याची परवानगी दिली आहे. पुढच्या 5 ते 6 दिवसांत या कंपनीतून पुरवठा केला जाईल. मात्र, यासाठी रिक्त सिलिंडरची संख्याही वाढत्या रुग्णसंख्येनुसार वाढवावी लागेल, तरच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, तशी तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - महापुराचा फटका: शासकीय गोदामातील 6 हजार क्विंटल धान्य खराब