भंडारा - जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडेगावस्थित अशोक लेलँड कंपनीने केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजेगाव वासियांचे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनामार्फत कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी टोमॅटो फेको आंदोलन केले आहे.
अशोक लेलँड कंपनीने राजेगाव येथील २६ एकर जागेवर अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीला घेऊन राजेगाव वासियांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आणि अनेक वेळा मोर्चाही काढला. मात्र, जिल्हा प्रशासनाने नेहमी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. त्यामुळे, संतप्त झालेल्या राजेगाव वासियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा पवित्रा घेतला. मात्र, आज ४ दिवस होऊनही जिल्हा प्रशासनामार्फत कुठलीही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या राजेगाव वासियांनी रस्त्यावर टोमॅटो फेको आंदोलन केले.
या आंदोलनानंतरही प्रशासनाने अतिक्रमण हटवले नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा राजेगाववासियांनी दिला आहे. अशोक लेलँड कंपनीने जमीन अधिग्रहणाच्या वेळेस जमिनीवर कारखाना बांधून स्थानिक लोकांना नोकरी देऊ, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या निम्म्या जागेवर कंपनीची स्थापना करण्यात आली आणि निम्मी जागा अजूनही मोकळी आहे. या मोकळ्या असलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम न झाल्यामुळे नियमाप्रमाणे ही जागा गावकऱ्यांना परत करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच ज्या लोकांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही गावकरी करीत आहेत. प्रशासकीय अधिकारी, अशोक लेलँडचे अधिकारी आणि गावकरी यांच्यात सदर प्रकरणी बऱ्याचदा चर्चासत्र होऊन त्याच्यावर तात्पुरते तोडगे काढले गेले. मात्र, स्थायी उपाय अजूनपर्यंत न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले.
हेही वाचा- भंडाऱ्यात बस पुलावरून 40 फूट खाली उतरली, 39 प्रवासी सुखरूप