भंडारा - राज्याची विधानसभा निवडणूक सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेस आणि भाजपचे राष्ट्रीय नेत्यांनी प्रचारसभेत उडी घेतलेली पाहायला मिळत आहे. छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री भूपेश बघेल हे काँग्रेसच्या प्रचारासाठी भंडाऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकार मुलभूत मुद्दे सोडून राष्ट्रवादासंबंधी मुद्दे घेऊन प्रचार करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याची बघेल यांनी टीका केली आहे.
हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज
बघेल यांच्या आघाडीचे उमेदवार नाना पटोले आणि जयदीप कवाडे यांच्या प्रचारासाठी साकोली व भंडारा येथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातली साकोली येथील प्रचारसभा रद्द करण्यात आली. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडची परवानगी न मिळाल्याने सभा रद्द झाली. साकोलीत दोन दिवसाआगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी हेलिपॅडची परवानगी मिळते. अन् त्यात साकोलीमध्ये काँग्रेसची मुख्यमंत्री प्रचारासाठी येणार असल्याने यांची प्रचारसभा होऊ नये, म्हणून त्यांना हेलिपॅडची परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
भंडारा येथील प्रचारसभेत बघेल म्हणाले, भाजप सरकार नागरिकांच्या भावनांशी खेळत आहे. मागील पाच वर्षात सर्वसामान्य जनतेशी निगडित प्रश्नाचे काय केले? या मुख्य विषयाबद्दल भाजपवाले बोलत नाहीत. मुख्य मुद्दे सोडून राष्ट्रवाद, कलम ३७०, याविषयी प्रचारात बोलले जात आहे. याचाच अर्थ सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच मुख्य मुद्यांना बगल देत लोकांना भावनिक करत मत मागण्याचे काम हे सरकार करत आहे, असे मुख्यमंत्री बघेल यावेळी म्हणाले.
बघेल म्हणाले, आम्ही सत्तेत येताच धानाला २५ हजार रुपये दर देऊ शकलो. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली. मात्र, ज्या भाजपने २०१४ मध्ये स्वामीनाथन आयोग लागू करू असे वचन दिले होते. त्यांनी अजूनही पूर्ण कर्जमाफी केली नाही. किंवा पिकांना दरही दिला नाही. मागील पाच वर्षांच्या कालावधीत भाजपला जे जमले नाही ते छत्तीसगडच्या सरकारने केवळ काही महिन्यातच करून दाखवले.
अजून पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रामध्ये तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शासनाच्या काळात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हे महाराष्ट्रासाठी दुर्भाग्य आहे. या काळात महागाई वाढली, आर्थिक मंदी आली, लोकांचे रोजगार गेले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार होता अजून मिळाला नाही. हे सर्व विषय तुमच्या सर्वांच्या जीवनाशी जोडलेले विषय आहेत. मात्र, विषयाबाबतीत भाजप अजिबात बोलताना दिसत नाही. कारण, त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप अंतर आहे असा आरोप भूपेश बघेल यांनी केला.
बघेल म्हणाले, नोटबंदीमुळे काळापैसा आला नाही, जीएसटीमुळे किती व्यापार बंद पडले याची माहिती सरकार देत नाही. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शेवटी मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - 'भाजप सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे'