भंडारा- कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य लोकांसाठी शासनाने पुरवलेल्या निधीचा वापर नागरिकांसाठी केला गेला नाही. खोटी बिले जोडून 10 लाखांचा अपहार भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. आपत्कालीन निधी अपहार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वाघमारे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. तहसीलदार यांनी ज्या गोष्टींवर खर्च दाखवले आहे त्यापेक्षा ज्यास्त गरजू लोकांना मदत केल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगतिले आहे. याविषयी तहलसीलदार यांच्याकडे माहिती घेण्यासाठी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी गेल्यावर त्यांनी याबाबत बोलणे टाळले.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासनाने जिल्ह्याला आपत्कालीन निधी दिला होता. या निधीचा वापर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी करण्यात आला. मात्र, या आपत्कालीन निधीच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी होत नसल्याने तहसीलदार यांनी निधी खर्च न करता खोटी बिले जोडून या निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोपी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला. साहित्य एका व्यक्तीकडून खरेदी करुन पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा करायला लावल्याचा प्रकार झाला, असेही वाघमारे म्हणाले आहेत.
जी बिले खर्च दाखवण्यासाठी जोडली गेली आहेत ती अधिकृत बिल नाहीत. यामध्ये जिजामाता फाऊंडेशन, भंडारा यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये पाच दिवस जेवण दिल्याचे बील आहे. मात्र, ही संस्था कुठेही नोंदणीकृत संस्था नसल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे. एवढेच नाही तर या संस्थेने या सेंटरवर स्वच्छता राखण्यासाठी दररोज दहा मजूर लावले त्यांची मजुरी प्रतिदिन 400 रुपये लावली आहे. ज्या क्वारंटाइन सेंटरच्या नावाखाली हे मजुरांचे बील काढले गेले त्या क्वारंटाइन सेंटरला मजूर पुरवणारी संस्था ही नोंदणीकृत नाही. 300 रुपये मजुरी असलेल्या मजुरांची प्रतिदिन मजुरी 400 रुपये दाखवण्यात आली, असे चरण वाघमारे म्हणाले आहेत.
क्वारंटाइन सेंटरवर गोंदियाच्या स्वामी विवेकानंद स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, यांना 28 एप्रिल ते 25 मे या कालावधीसाठी कंत्राट दिले. त्या मोबदल्यात या संस्थेला 1 लाख 88 हजार रक्कम दिल्याचे बिलावरून स्पष्ट होत आहे. लॉकडाऊनच्या काळात गोंदियाचा कंत्राटदार हा भंडारा मध्ये दाखल कसा झाला आणि तो भंडारामध्ये आल्यावर त्याला 14 दिवस क्वारंटाइन का केले नाही, असा सवाल चरण वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.
भंडारा शहरातील बऱ्याच सामाजिक संस्थांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना जेवण दिले आहे. भंडारा शहरात प्रवेश करतात लोकांना जेवण देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तब्बल 50 दिवस लोकांना अविरत जेवण दिल्याचे सांगतिले आहे. 100 लोकांपासून सुरुवात होऊन साडेतीन हजार लोकांना एकाच दिवशी जेवण दिले असे, मोहित पाटेकर या सामाजिक कार्यकर्त्याने सांगतिले.
आपत्कालीन निधीबाबत केलेल्या आरोपांविषयी तहसीलदार यांना विचारण्यासाठी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी गेले असता त्यांना 1 तास बसवून ठेवण्यात आले. माजी आमदार वाघमारे यांनी याप्रकरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पाठवून याची चौकशीची मागणी केली आहे. खरेच या प्रकरणाची चौकशी होते का? आरोप खरे असल्याचे सिद्ध झाल्यास काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.