भंडारा- जिल्ह्यातील मोटघरे महाविद्यालय, कोंढा येथील संस्थाचालकाने आदिवासी विद्यार्थ्यांची बोगस कॅम्प संख्या दाखवून १० लाख रुपये शासनाकडून लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील कोंडा कोसरा गावात मोटघरे महाविद्यालय असून या महाविद्यालयात विविध आभ्यासक्रमाची शाळा व महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयात २०१० ते १२ या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांचे बोगस विद्यार्थी कॅम्प राउंड दाखवून तसेच खोटे कागदपत्रे तयार करून आदिवासी प्रकल्प कार्यालयात सादर करण्यात आले. आणि १० लाख रुपये शिष्यवृत्ती हडप केली.
तक्रारी नंतर याची चौकशी आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारे करून अरुण मोटघरे यांना दोषी ठरवण्यात आले. तसेच सदर रक्कम २०१२ मध्ये शासन जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मोटघरे यांनी ती रक्कम शासन दरबारी जमा केली नाही. यामुळे प्रकल्प अधिकारी मेश्राम यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संस्था अध्यक्ष अरुण मोटघरे, सुजाता मोटघरे व भूपेंद्र गजभिये यांच्या विरुद्ध शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर आणखी मोठे घबाड उघडीस येण्याची शक्यता असून आरोपी सध्या फरार आहेत.