भंडारा - बाहेर गावावरून शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकाच मालाचे २ वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहे. त्यामुळे शनिवारी शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत काही काळ रस्ता रोको केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना याबाबतचे निवेदन दिले.
बीटीबी खासगी भाजी मंडईमध्ये ५ जुलैपासून दुचाकीवर आणि ऑटोवर शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या मधोमध थांबून त्यांच्याकडून प्रतिपोते दहा रुपये प्रमाणे जबरदस्तीने वसुली केली जात आहे. रस्त्यावर अचानक थांबून पैसे मागण्याच्या या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना भाजी मंडईच्या आत ही पैसे द्यावे लागत आहेत. तसेच आता रस्त्यावर ही त्यांना पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि वसुलीसाठी असलेल्या तरुणांचे वाद होत आहेत.
भंडारा शहरामधील बीटीबी खासगी भाजी मंडईमध्ये दररोज शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. काही शेतकरी हे सरळ व्यापाऱ्यांना माल विकतात तर काही तिथेच बसून किरकोळ मालाची विक्री करतात. या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करू देण्यासाठी बीटीबी मंडईतर्फे पैसे घेतले जात होते. भंडारा नगरपरिषदतर्फे यावर्षी बाजार शुल्क वसूल करण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले त्याला बीटीबीच्या खासगी मंडईच्या मालकाने मारहाण करुन त्यांना तेथून पळवून लावले. यामुळे कंत्राटदाराने याची तक्रार पोलिसात केली. मात्र, २६ लाखात हे कंत्राट घेतल्यामुळे यातून काही तरी मार्ग काढावा, यासाठी कंत्राटदाराने मुख्याधिकारांना विनंती केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला रस्त्यावर शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिल्याचे कंत्राटदाराने सांगितले. त्यामुळे त्यांच्या आदेशावरुनच ३ वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास १५ ते २० तरुण वसुलीसाठी ठेवून शेतकऱ्यांकडून ही वसुली केली जात होती, अशी माहिती कंत्राटदाराने दिली.
बीटीबीच्या मंडईमध्ये पैसे घेत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी बीटीबीच्या मालकांनी या आरोपाचे खंडन केले आहे. आम्ही पैसे घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी आज त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकत काही काळ रस्ता रोको केला आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी बीटीबी भाजी मंडईचे प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्या चर्चेनंतर जबरदस्ती वसुलीचे प्रकार आम्ही करणार नाही, अशी कंत्राटदाराने तर मंडईच्या आत किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडूनही पैसे घेणे बंद करू, असे बी बीटीबी च्या प्रतिनिधी लिहून दिले. मात्र, या लेखी आश्वासनाची पूर्ती होते का आणि शेतकऱ्यांची पिळवून थांबते का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.