भंडारा- देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे, राम नवमीचे औचित्य साधून भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्यामार्फत बहिरंगेश्वर मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तादान शिबिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जवळपास ५० लोक रक्तदान करणार आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहाने या मंदिरातून रामनवमीची मिरवणूक निघते. मात्र, या वर्षी कोरोनामुळे रामनवमी उत्सव सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे, खासदार लोंढे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यांनी स्वतः रक्तदान शिबिराला भेट देऊन दात्यांची चौकशी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील चमूने सकाळी १२पासून रक्तदानाला सुरुवात केली होती. रक्तदानासाठी ४ बेड वेगवेगळ्या अंतरावर ठेवण्यात आले होते. शहरातील स्त्री, पुरुष, तरुण मंडळींनी मोठ्या उत्साहाने या रक्तदान शिबिरात भाग घेत आपले रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी पोलीस निरीक्षक आणि त्यांची चमूदेखील उपस्थित होती.
तसेच महसूल अधिकारीदेखील शिबिराला उपस्थित राहून उपस्थितांना दुरावा ठेवण्याच्या सूचना देत होते. तसे रक्ताचा जेवढा तुटवडा होत आहे, त्याचा विचार करता जवळपास १०० लोकांचे रक्तदान होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागत असल्याने केवळ ५० लोक दिवसभरात रक्तदान करू शकणार आहेत. तरी, देशाची रक्ताची गरज लक्षात घेता आज नागरिकांनी केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे सांगत नागरिकांनी स्वतः च्या घरी राहावे आणि १४ तारखेपर्यंतच्या लॉकडाऊनचे पालन करावे, अशी विनंती त्यांनी केली.