भंडारा - आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांपैकी एक जागा ही शिवसेनेसाठी आहे. भाजपने तिथेही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चर्चेला उधाण आले आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी सहा लोकांनी मुलाखती दिल्या. साकोली विधानसभेसाठी 22 आणि भंडारा विधानसभेसाठी 23 लोकांनी मुलाखती दिल्या आहेत. भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी इच्छुकांची गर्दी झालेली आहे.
2009 मध्ये भाजप-शिवसेना युती झाली, तेव्हा भंडारा विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेला मिळाले होते. यावेळीही युती झाली तर भंडारा विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या कोट्यात जाऊ शकते. याबाबत कल्पना असूनही भाजपने भंडारा विधानसभा क्षेत्रात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मध्ये विद्यमान आमदारांचाही समावेश होता.
हेही वाचा - गोसेखुर्द प्रकल्पातील पुनर्वसित गावांमधील विकासकामांत कोट्यवधीचा घोटाळा, राष्ट्रवादीचा आरोप
भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव असून विद्यमान आमदार भाजपचे रामचंद्र अवसरे हे आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रातून भाजपचेच चरण वाघमारे आमदार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे बाळा काशीवार हे विद्यमान आमदार आहेत.
या तीनही विद्यमान आमदारांपैकी किमान दोन आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या मुलाखती घेण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड आले होते. मुलाखतीनंतर कोर कमिटीची बैठक घेऊन काही नावे जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.