भंडारा- जिल्ह्याच्या महर्षी विद्या मंदिर आणि रॉयल पब्लिक स्कूलने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार पुढे आला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह महर्षी विद्या मंदिरमध्ये चर्चा करण्यासाठी पोहोचले. मात्र, शिक्षकाने पालकांना आणि आमदारांना गेटमधून प्रवेश करू दिला नाही. पालक आणि शाळेतील शिक्षक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाली.
महर्षी विद्या मंदिर आणि रॉयल पब्लिक स्कूलमध्ये बराच काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बोलाविण्यात आला होता. दिवसभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर शिक्षण विभागाने या शाळेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सराव परीक्षामध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
2020 या वर्षात कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे व्यवसाय बुडाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाईचा लोकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही पालकांना पाल्याची शैक्षणिक फीस जमा करणे अडचणीचे जात आहे. पण असे असले तरी शुल्क जमा करू, असे पालकांनी शाळा प्रशासनाला आश्वासन दिले. पण, पाल्यांचे शिक्षण थांबू नका, अशी विनंती केल्यानंतरही भंडारा जिल्ह्याच्या महर्षी विद्या मंदिर आणि रॉयल पब्लिक स्कूलने सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना बसू दिले नाही. जोपर्यंत फिस नाही, तोपर्यंत तुम्हाला परीक्षा देता येणार नाही अशी भूमिका या दोन्ही शाळेने घेतली.
पालकांना चर्चेसाठी प्रवेश न दिल्याने वाढले वाद-
पालक हे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शाळेत पोहोचले. महर्षी शाळेतील शिक्षकाने आमदार नरेंद्र भोंडकर यांच्याशी वाद घालत त्यांना शाळेच्या गेटवर थांबविले. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले शिवसैनिक आणि पालक संतप्त झाले. त्यांनी शाळेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात धक्का बुक्की आणि शाब्दिक भांडण झाले. एवढेच नाहीतर आमदार भोंडेकर यांना या शिक्षकांनी शिव्या दिल्यामुळे अजूनच वातावरण तापले होते. या शिव्या देणाऱ्या शिक्षकाला शिवसैनिकांनी आणि पालकांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
प्रिन्सिपलच्या गेट समोर ठिय्या आंदोलन
शिक्षक आणि प्रिन्सिपलसोबत झालेल्या भांडणामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पालकांना घेऊन प्रिन्सिपलच्या दारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. उप शिक्षणाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येत प्रिन्सिपल यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. आमदार भोंडेकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि बच्चू कडू यांच्याशी फोनवर संपर्क साधून या सर्व प्रकरणाची माहिती दिली. शिक्षण विभागाने कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले.
प्रिन्सिपलच्या मते आंदोलनकर्ते पालक नाहीत-
शाळेचे शुल्क न भरल्याने मुलीला आज परीक्षेत बसू दिले गेले नाही. त्याचा मेसेज पालकाच्या मोबाईलवर आला. मात्र, याविषयी शाळेच्या प्रिन्सिपलला विचारले असता हे पालक आमच्या शाळेतील नाहीत, असा त्यांनी दावा केला. बाहेरील लोकांना आणून इथे गोंधळ निर्माण करण्याचे काम आमदार नरेंद्र भोंडेकर आणि सिनेट सदस्य प्रवीण दापुरे करीत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
सीबीएससी शाळेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सत्याग्रह आंदोलन
सीबीसी शाळेतील अनागोंदी कारभाराविरुद्ध मागील पंधरा दिवसांपासून सिनेट सदस्य प्रवीण दापुरे यांच्या नेतृत्वात पालक सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. तरीही विद्यार्थ्यांना चक्क परीक्षेपासून वंचित ठेवण्याचे धाडस शाळा करत असल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहेत.
आमदार नरेंद्र भोंडकर म्हणाले की, आमच्या शहराध्यक्षांची मुलगी आहे. त्यांच्या मुलीला शाळेने परीक्षेला बसू दिले नाही. हा गोरगरिबांवर अन्याय आहे. आरटीईप्रमाणे त्यांना मोफत शिक्षण द्यावे. संस्थेचे लोक उर्मट आहेत. इंग्रजाप्रमाणे त्यांची वर्तणूक आहे. आमदारालाही गेटवर थांबविले जाते. शाळेवर प्रशासकाची नियुक्ती व्हावी. ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी.
पालक सविता तुरकर म्हणाल्या की, शुल्क न भरल्याने मुलीला परीक्षेला बसू दिले नाही. मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर जबाबदार कोण? प्राचार्य श्रुती ओहळे म्हणाल्या की, सरकारच्या नियमाप्रमाणे शाळेची फी भरण्यासाठी सूचना केली होती. मात्र, जाणूबुणुन वाद केला जात आहे. भंडाराचे उपशिक्षणाधिकारी राजाभोज बांभोरे म्हणाले की, आमच्या विभागाकडे तक्रार आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार आहेत.