भंडारा -शहर पोलीस आणि भंडारा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त कारवाईमध्ये मागील दोन दिवसात विनाकारण शहरात फिरणाऱ्या 129 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 25800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आले आहे.
या कारवाई मुळे शहरात नाहक फिरणाऱ्या लोकणाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. संचारबंदी सुरू असूनही काही नागरिक विनाकारण शहरात फिरत असतात. त्यांना थांबवून फिरण्याचे कारण विचारल्यास बऱ्याचदा शाब्दिक चकमकी होतात. आता हे टाळण्यासाठी भंडारा शहर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी जिल्ह्याच्या शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, पोलीस स्टेशन समोर अशा विविध ठिकाणी हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दुचाकी आणि चारकाची वाहन चालकांना अडवून त्यांना फिरण्याचे कारण विचारतात.
तसेच वाहन चालविण्याचा परवाना विचारला जातो. परवाना नसलेल्या लोकांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा चलन फाडले जात आहे. यामुळे भांडणाचा प्रकारावर आळा बसला आहे. बुधवारी या कारवाईला सुरवात केली गेली होती. पहिल्या दिवशी 43 लोकांवर कारवाई करण्यात आली तर गुरुवारी 86 लोकांनावर ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाई मुळे विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर नक्कीच वचक बसेल असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांचा आहे.खरंतर संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घरात राहावे ही त्यांची नैतिक जवाबदारी आहे. मात्र असे असले तरी नागरिक घराबाहेर निघतात. त्यामुळे पोलिसांना या टवाळखोर लोकांवर निर्बंध लावण्यासाठी नवनवीन उपाय शोधावे लागत आहेत. भंडारा पोलिसांनी सुरू केलेला हा उपाय किती उपयुक्त सिद्ध होत हे येणाऱ्या काळात कळेल.