भंडारा - जिल्ह्यात ९ तारखेपासून १४ तारखेपर्यंत संचारबंदी आहे. त्याचे सक्तीने पालन करवून घेण्यासाठी गुरुवारी पोलीस विभागातर्फे पथ संचलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांचे मनोबल वाढवीत तुमच्या प्रयत्नात आम्ही तुमच्या सबोत आहोत, असा संदेश जणू दिला. त्याचबरोबर, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्याचा सराव देखील करण्यात आला.
कोरोनासारख्या घातक विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात बरेच नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे. मात्र, अजूनही काही नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य पटले नसल्याचे दिसून आले आहे. या लोकांना समज देण्यासाठी आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरभर पथ संचलन करण्यात आले. या दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे वारंवार आवाहन केले. यादरम्यान, नागरिकांनी घरा बाहेर निघून टाळ्या वाजवून पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.
दरम्यान, पोलिसांचे पथ संचलन गांधी चौकातून प्रारंभ होऊन संपूर्ण शहरभर फिरून पुन्हा गांधी चौकात पोहचले. येथे गरज पडल्यास लाठीचार्ज कसा करावा याचा पोलिसांनी सराव केला. आता आम्ही कोणाची गय करणार नाही, आम्हाला वरिष्ठांचे आदेश मिळाले आहेत, विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तुम्हाला पोलिसांच्या कारवाई पासून वाचायचे असेल तर कृपया घरी राहा, विनाकारण घराबाहेर पडू नका, अशा कठोर शब्दात पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले.
हेही वाचा- जिल्ह्यात संचारबंदी अधिक सक्तीची; प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन