भंडारा - भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. तर, भंडारा शहरातील एका मतदान केंद्रावर 'मै ओबीसी' अशी टोपी घालून आलेल्या एका मतदाराचे भाजप कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक भांडण झाले. या भांडणामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
18 हजार 434 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भंडारा जिल्ह्यातील 18 हजार 434 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी जिल्ह्यात 27 मतदान केंद्र असून सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोरोना काळात होत असलेल्या या मतदानात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छतागृह, मदत कक्ष, सोशल डिस्टन्सिंग, तसेच थरमल गणचा वापर केला जात आहे.
खासदारांनी त्यांच्या पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी आपल्या पत्नीसह पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मागील ५२ वर्षापासून आम्ही या पदवीधर संघाचे प्रतिनिधित्व करीत असून या वेळेही पूर्ण बहुमताने आम्हीच निवडणूक जिंकू, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
वर्षभरापासून आघाडी सरकारने केलेले गोंधळ काम आणि मोदीजी यांनी केलेल्या चांगल्या कामांचा विचार केला, तर सूज्ञ पदवीधर मतदार आमच्याच बाजूने कौल देतील, असे मेंढे म्हणाले.
मतदान केंद्रावर काहीकाळ झाला गोंधळ
ओबीसीचे समर्थन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुकेश पुडके हे 'मै ओबीसी' लिहिलेली टोपी आणि दुपट्टा घालून मतदान करण्यासाठी आल्यावर केंद्रावर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. ही टोपी आणि दुपट्टा घालून तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर, संविधानानुसार मी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात आहे. या मध्ये कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होत नाही, असे सांगत मतदान करण्यास जात असलेल्या पुडके आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. या वादामुळे काही काळ मतदान केंद्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मतदान केंद्रावर येऊन पुडके यांना पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे, मतदान केंद्रावरील वातावरण शांत झाले, आणि मतदान सुरळीत सुरू राहिले.
हेही वाचा - भंडारा : दोन दिवसांपासून सुरू असलेले रुग्णवाहिका चालकांचे उपोषण मागे