भंडारा - शनिवारी निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केली. त्यानुसार 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. भंडारा जिल्ह्यात 9 लाख 90 हजार 665 मतदार आहेत. यावर्षी भंडारा जिल्ह्यातून कोणत्या पक्षाची आणि उमेदवारांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भंडारा जिल्हा प्रशासन निवडणुकाच्या तयारीला लागले आहे. जिल्ह्यात तुमसर-मोहाडी, भंडारा-पवनी आणि साकोली-लाखांदूर-लाखणी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रात एक लाख 52 हजार 779 पुरुष तर एक लाख 48 हजार 951 स्त्री असे एकुण 3 लाख एक हजार 730 मतदार आहेत. तर भंडारा विधानसभा क्षेत्रात एक लाख 85 हजार 216 पुरुष आणि एक लाख 85 हजार 474 स्त्री असे एकूण 3 लाख 70 हजार 690 मतदार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 819 पुरुष आणि एक लाख 57 हजार 416 स्त्री मतदार असे एकूण 3 लाख 18 हजार 245 मतदार आहेत. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात 4 लाख 98 हजार 824 पुरुष आणि 4 लाख 91 हजार 441 स्त्री असे एकूण 9 लाख 90 हजार 665 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी 1 हजार 642 ही सैन्यातील मतदार आहेत. तसेच 4 हजार 744 मतदार हे अपंग असून यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून प्रशासनाने यांच्यासाठी विशेष तयारी केली आहे.
या निवडणुकीसाठी भंडारामध्ये 1 हजार 206 मतदान केंद्र राहणार आहेत. तसेच निवडणुक सुरळीत पार पडावी यासाठी 6 हजार 30 कर्मचारी व अधिकारी कार्यरत असणार आहेत. जिल्ह्यात सात आदर्श मतदान केंद्र राहणार असून तेवढेच सखी मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यातील 19 मतदान केंद्र संवेदनशीन आहेत. सर्व निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी 14 फिरते पथक, 14 तीर पथक आणि 18 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानादरम्यान गडबडी झाल्यास c-vigil या ॲपवरून मतदार आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. तसेच 1950 या हेल्पलाइनवर कॉल करून मतदार यादीत मतदाराचे नाव आहे की नाही याची माहिती घेऊ शकतात.