भंडारा - धानाचे कोठार अशी ओळख असणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरिपासाठी प्रशासन तयार झाले आहे. यावर्षी हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन केले गेले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली, त्यापैकी आतापर्यंत ४२ हजार ५७५ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. तसेच खतांची मागणीप्रमाणे उपलब्धता असल्याने खताची टंचाई होणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील ३ वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्यामुळे दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यातच या वर्षीही जून महिना संपत आला तरी पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ९२ हजार ६५० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. यात भात १ लाख ८० हजार हेक्टर तर तूर १२ हजार १०० हेक्टर आणि सोयाबीन ५५० हेक्टर आहे. जिल्ह्यात ९५ टक्के भात शेती होत असून यावर्षी ४३ हजार ७३९ क्विंटल बियाणांची मागणी होती त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ९२ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यापैकी महाबीजचे ७५५२ आणि खासगी ३४ हजार ५३९ बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पाऊस न पडल्याने या बियाण्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत केवळ सात हजार ४४९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. यात महाबीजची मागणी जास्त असून ५७०५. ८७ क्विंटल तर खाजगी १६४३ बियाण्यांची विक्री झाली आहे. तसेच अजून ३४ हजार ६४२ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.
भातानंतर जिल्ह्यामध्ये १२ हजार शंभर हेक्टर आणि ५५० हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. तुरीची मागणी ८६५ क्विंटल असून आतापर्यंत केवळ २२६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामुळे ६३९ क्विंटल तुरी बियांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सोयाबीन ३५०क्विंटल मागणी असून पुरवठा २५७ क्विंटल झाला आहे. मात्र, अजून पर्यंत सोयाबीनची विक्री शून्य आहे.
खरिपासाठी खतांचे नियोजन झाले आहे. यात युरिया १० हजार मेट्रिक टन एसएसपी १२ हजार मेट्रिक टन आणि संयुक्त खते १३ हजार मेट्रिक टन बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे खरिपाला सुरूवात झाल्यास खते आणि बियाणे याची कमतरता भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी साहेबराव चौहान यांनी सांगितले. तसेच पावसाला सुरूवात झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही ते म्हणाले.