भंडारा- पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या पैशावर जिल्हा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेने डल्ला मारला आहे. शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक विम्याचा पैसा कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेने सरळ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती केला आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली होती त्यांची ही सरळ सरळ फसवणूक बँकेने केली आहे. शासनाचा कोणताही आदेश नसतांना बँकेने स्वमर्जीने कर्ज खात्यात जमा केलेला पीक विम्याचा पैसा आम्हाला परत करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
भंडारा तालुक्यातील शहापूर गावातील अरुण कारेमोरे यांनी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेतून ६७ हजाराचे कर्ज घेतले होते. बँकेने यावर पीक विम्यासाठी लागणारी रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली. निसर्गाने केलेल्या प्रकोपामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याच्या पैशांमधून काही प्रमाणात नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा कारेमोरे यांना होती. मात्र, प्रत्यक्षात शासनाकडून पीक विम्याचे १३ हजार रुपये बँकेत जमा होताच बँकेने ते पैसे अरूण कारेमोरे यांच्या बचत खात्यात जमा न करता त्यांच्या कर्ज खात्यात जमा केले.
कारेमोरे यांच्याप्रमाणे उमेश शेंद्रे यांचे देखील पीक विम्याचे ७००० आणि त्यांच्या वडिलांचे १२००० रुपये बँकेने परस्पर कर्ज खात्यात वळते केले. त्यामुळे, शेतकऱ्यांना पीक विम्याचा पैसा मिळूनही त्यांचे नुकसान झाले आहे. आता शासन शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करीत आहेत. त्यासाठी पाठविल्या गेलेल्या यादीत या शेतकऱ्यांना पीक विम्याची मिळालेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम कर्ज स्वरुपात दाखवून तशी यादी शासनाला पाठविला गेली आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हक्काचे पैसे परत करा, अशी मागणी केली आहे.
१३ डिसेंबर २०१९ मध्ये पीक विम्याची रक्कम शासनातर्फे आली होती. एकट्या शहापूर गावातील शाखेमध्ये ८९० शेतकऱ्यांचे ७८ लाख ४४ हजार ४५४ रुपये आले होते. संपूर्ण जिल्ह्यातील या बँकेच्या शाखेमध्ये पीक विम्याचे कोट्यावधी रुपये आलेले आहेत. हे सर्व पैसे बँकेने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केले. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे हे कर्ज खात्यात जमा करण्याचा शासनाचा कोणताही आदेश नव्हता. मात्र, बँकेच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे आम्ही संपूर्ण पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात घातल्याचे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले. शासनाचा कोणताही आदेश नसताना बँकेने स्वमर्जीने शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारला. शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या बँकेवर कार्यवाही होणार का ? हाच खरा प्रश्न आहे.
हेही वाचा- भंडाऱ्यात लग्न समारंभातील अन्नातून 150 जणांना विषबाधा, उपचार सुरू