भंडारा - लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका 30 वर्षीय तरुण ऑटोचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी गावातील प्रवीण विजय मेश्राम असे या ऑटोचालकाचे नाव आहे. तो मागील 10 वर्षांपासून ऑटो चालवत होता. त्याच्या मागे चिमुकली मुलगी, पत्नी आणि आई-वडील आहेत.
विशेष म्हणजे, प्रवीणच्या अंत्यसंस्कारासाठीही त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. मूळचे भंडारा शहरातील राहणारे मात्र मागील 30 वर्षांपासून वरठीमध्ये स्थायिक झालेले विजय मेश्राम (वय 60) हे भंडारा ते वरठी ऑटो चालवीत आपले कुटुंबाचा गाडा हाकत होते. कालांतराने त्यांचा मुलगा प्रवीण याने ही ऑटो चालवायला सुरूवात केली. प्रवीण मागील 10 वर्षापासून ऑटो चालवत होता. चार वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले. त्याला तीन वर्षांची एक लहान मुलगी सुद्धा आहे.
संसार सुखरूप सुरू होता. मात्र, लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून ऑटो बंद झाल्याने कमाईचे दुसरे साधन त्यांच्याकडे नव्हते. पाच लोकांच्या संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी प्रवीणच्या आई-वडिलांनी भाजीपाला विक्री सुरू केली. मात्र, यातून मिळणाऱ्या पैशांतून या कुटुंबाची गरज भागली जात नव्हती.
परिणामी प्रवीण आणि त्याच्या कुटुंबात वाद निर्माण सुरू झाले. या आर्थिक विवंचनेतून तीन दिवसांपूर्वी पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली. याचा प्रवीणच्या मनावर मोठा आघात झाला शेवटी 29 तारखेला प्रवीणने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर प्रवीणचे वडील पुरते खचले आहे.