भंडारा - तुमसर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून चार लोकांना अमानुष मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचल्यामुळे या चारही लोकांचे प्राण वाचले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चोवीस आरोपींना अटक केली असून यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या राजापूर या गावात शनिवारी रात्री 25 ते 30 लोकांनी मिळून कुंदन गौपले, ओम प्रकाश मेश्राम, मनोहर थोटे आणि कचरू राऊत या चौघांना अमानुषपणे नग्न करून मारहाण केली. ही गर्दी एवढ्यावरच थांबले नाही, तर या चौघांवर ही पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, अगदी वेळेवर पोलीस पोहोचल्यामुळे या चार लोकांना पोलिसांनी या गर्दीतून बाहेर काढून सुरक्षित पोलीस स्टेशनला नेले. पोलिसांना पोहोचण्यात थोडा जरी वेळ झाला असता, तरी या चारही लोकांचा जीव नक्कीच गेला असता.
सविस्तर वाचा - भंडारा : जादूटोणा केल्याच्या संशयावरुन 4 लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
अडीच हजार लोकसंख्या असलेल्या राजापूर गावात मागील आठ दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. योगेश चोपकर (27) याच्या पत्नीची प्रकृती सतत बरी राहत नसल्यामुळे तिला बाहेरची भूतबाधा झाली असल्याची शंका परिवारातील लोकांनी व्यक्त केली. त्यातच योगेशच्या पत्नीच्या अंगात भूत संचारल्यानंतर ती मारहाण झालेल्या चारही लोकांच्या घरी जाऊन उभी होत असे. त्यामुळे या चारही लोकांनी या महिलेला भूतबाधा केली असल्याचा संशय बळावला. त्यानंतर वाद निर्माण झाले, तंटामुक्ती अध्यक्ष च्या माध्यमातून हा वाद सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पुढच्या सात दिवसात माझ्या पत्नीची प्रकृती बरी करून दे, असे योगेशने या चौघांनाही बजावले होते.
शनिवारी पुन्हा योगेशच्या पत्नीची प्रकृती खराब झाली, ती पुन्हा या चार लोकांच्या दारापुढे जाऊन उभी झाली. त्यामुळे योगेश आणि गावातील इतर मंडळी संतापले. त्यांनी या चौघांनाही रात्री आठ ते नऊच्या दरम्यान गावाच्या मधोमध असलेल्या बोरवेल जवळ आणले आणि तिथे मारहाण सुरू झाली. ही मारहाण रात्री एक वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर आरोपींनी या चौघांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस योग्य वेळेवर पोहोचले. या चौघांनाही जाळण्याअगोदर पोलीसांनी त्यांना गाडीत सुरक्षित गोबरवाही पोलीस स्टेशनपर्यंत आणले.
हेही वाचा - नागपूर पोलिसांची माणूसकी; जनता कर्फ्यूमध्ये अडकलेल्या दाम्पत्याला पोहोचवले घरी..
घटनेची माहिती होतास घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपपोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली. सुरुवातीच्या तपासानंतर 24 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये योगेश चोपकर (27), देवा चोपकर (35), रवी राऊत (45), महेंद्र राऊत (40), अविनाश मेश्राम (27), मच्छिंद्र परबते (36), निरंजन परबते (38), सुखदेव परबते (33), राजकुमार घोनाडे (26), राजेंद्र घुमरे (35), प्रतीक अरकाम (45), प्रवीण पर्वते (30) ,विषाल मेश्राम (30), आकाश वघारे (25), रीची डोंगरे (32), नौशाद पठाण (30) आणि सात महिलांचा समावेश आहे. सध्या तपास तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पीपलवर यांच्याकडे देण्यात आला आहे.
मारहाण झालेल्या चारही लोकांना तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असून त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा आहेत. त्यांच्या शरीरावरील जखमा भविष्यात भरतीलही मात्र, मनाच्या जखमा तशाच राहतील. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही घटना अतिशय निंदनीय घटना आहे.