भंडारा - जिल्ह्यात दसऱ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नागरिकांनी या कार्यक्रमांना गर्दी केली होती. मात्र, यावर्षी राजकीय नेत्यांनी खऱ्या अर्थाने दसरा साजरा केल्याचे चित्र जिल्ह्यात होते.
दसऱ्यानिमित्त जमलेल्या हजारो नागरिकांना मत मागण्यासाठी आणि आपला प्रचार करण्यासाठी सर्व विधानसभा उमेदवारांनी आपले तंबू थाटले होते. दुर्गादेवीच्या मूर्तीला अभिवादन करण्यापेक्षा मतदारांना अभिवादन करण्यात राजकीय नेते मंडळी व्यस्त होती.
हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवत म्हणतायेत... देशात मंदी नाही
दरवर्षी तुमसर येथील नेहरू मैदानावर दसरा सण साजरा केला जातो. कुस्ताच्या आखाड्यात पहिलवान त्यांच्या कलेची प्रात्यक्षिके दाखवतात. या सणानिमित्त हजारो नागरिक या मैदानावर येतात. याचा फायदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनी करून घेतला. या पक्षाच्या उमेदवारांनी आपला प्रचाराचा मोर्चा दसरा मैदानाकडे वळवला.